जाहिरात

Bharat Taxi: आता ट्रॅफिक असो की पाऊस, टॅक्सीचे भाडे वाढणार नाही! मुंबई आणि पुणेकरांसाठी राज्य सरकारची मोठी भेट

Bharat Taxi: भारत टॅक्सीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे एकाच मोबाईल ॲपद्वारे प्रवाशांना कार, ऑटो-रिक्षा आणि बाईक टॅक्सी असे तिन्ही पर्याय उपलब्ध होणार आहेत.

Bharat Taxi: आता ट्रॅफिक असो की पाऊस, टॅक्सीचे भाडे वाढणार नाही! मुंबई आणि पुणेकरांसाठी राज्य सरकारची मोठी भेट
Bharat Taxi: पहिल्या टप्प्यात मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांमध्ये ही सेवा सुरू होत आहे.
मुंबई:

Bharat Taxi: कॅब चालकांची भाडे नाकारण्याची कटकट, पीक अवर्समधील अव्वाच्या सव्वा दर आणि ट्रॅफिक किंवा पावसात होणारी आर्थिक पिळवणूक यातून आता सर्वसामान्यांची कायमची सुटका होणार आहे. कारण राज्य सरकारने प्रवासी आणि चालकांसाठी प्रवासाचा नवा अध्याय सुरू करत अधिकृत 'भारत टॅक्सी' सेवेची घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांमध्ये ही सेवा सुरू होत असून, सुरुवातीला तब्बल 600 टॅक्सींचे अनावरण करण्यात आले आहे.

एकाच ॲपमध्ये कार, रिक्षा अन् बाईक टॅक्सी; खिशाला परवडणारे दर

भारत टॅक्सीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे एकाच मोबाईल ॲपद्वारे प्रवाशांना कार, ऑटो-रिक्षा आणि बाईक टॅक्सी असे तिन्ही पर्याय उपलब्ध होणार आहेत. ही सेवा पूर्णपणे पारदर्शक, सुरक्षित आणि सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी आहे. यामध्ये सुरुवातीच्या पहिल्या 1.5 किलोमीटरच्या प्रवासासाठी 31 रुपये भाडे आकारले जाईल, तर त्यानंतरच्या पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 21 रुपये दर असणार आहे. त्यामुळे अचानक वाढणाऱ्या भाड्याच्या त्रासापासून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ना सर्ज प्रायसिंग, ना भाडे नाकारण्याची कटकट

अनेकदा ऑफिसच्या वेळेत किंवा लोकल ट्रेन बंद पडल्यानंतर टॅक्सी बुक करताना प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. खाजगी कंपन्या परिस्थितीचा फायदा उचलत सर्ज प्रायसिंगच्या नावाखाली भरमसाठ पैसे उकळतात किंवा चालक भाडे स्वीकारत नाहीत. मात्र केंद्र सरकारच्या मदतीने सुरू झालेल्या भारत टॅक्सी सेवेमध्ये भाडे पूर्णपणे निश्चित असणार आहे. पाऊस असो किंवा भीषण वाहतूक कोंडी, यामध्ये दरात कोणताही बदल होणार नाही.

सहकारी मॉडेल; चालकच असणार कंपनीचे मालक

भारत टॅक्सी ही सेवा केंद्र सरकारचे सहकार मंत्रालय आणि नॅशनल ई-गव्हर्नन्स डिव्हिजन (NeGD) यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे. यासाठी 'सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेड' या संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. खाजगी कंपन्यांच्या तुलनेत ही सेवा पूर्णपणे सहकारी संस्थेच्या (Co-operative) माध्यमातून चालवली जाईल. त्यामुळे यात टॅक्सी चालवणारे चालक हे केवळ कर्मचारी नसून ते या संस्थेचे थेट मालकही असतील. यामुळे चालकांना त्यांच्या मेहनतीचा संपूर्ण मोबदला मिळेल.

ॲप कसे डाऊनलोड कराल?

अँड्रॉइड आणि आयफोन युजर्स आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअरवरून 'भारत टॅक्सी' हे ॲप सहज डाऊनलोड करू शकतात. हे ॲप मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती अशा प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रवाशांची आर्थिक पिळवणूक थांबवून त्यांना सुरक्षित आणि वाजवी दरात प्रवास घडवणे हे या प्रकल्पाचे मुख्य ध्येय आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com