Bhiwandi News : भाजप आणि शिवसेनेत फूट; भिवंडी पालिकेची सत्तेची समीकरणं पुन्हा बदलणार

भिवंडीत भाजपा आणि  शिवसेना या महायुतीतील दोन पक्षात फूट पडली असल्याचे समोर येत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

भूपेंद्र आंबवणे, प्रतिनिधी


Bhiwandi News : भिवंडी महापालिका निवडणुकीत एकाही राजकीय पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे तब्बल एक महिन्यानंतर ही कोणत्याच पक्षाच्या उमेदवाराकडून संख्याबळाचे गणित जुळून येण्यात अपयश आलं आहे. परिणामी भाजपा आणि  शिवसेना या महायुतीतील दोन पक्षात फूट पडली असल्याचे समोर येत आहे. सोमवार 16 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी महायुतीतील भाजपा पाठोपाठ शिवसेनेने सुद्धा महापौर आणि  उपमहापौर पदाची निवडणूक लढवणार असल्याचे शिवसेना पक्षनेते प्रकाश पाटील यांनी शिवसेना प्रमुख पदाधिकारी व ज्येष्ठ नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये जाहीर केले आहे. या घोषणेनंतर भिवंडी पालिकेतील सत्तेची समीकरणं पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता असून त्यामध्ये कोण यशस्वी होतं हे 20 फेब्रुवारी रोजी स्पष्ट होणार एवढे नक्की.


भिवंडी महानगरपालिकेतील समीकरणं...

भिवंडी पालिकेची सार्वत्रिक निवडणूक भाजपा आणि  शिवसेनेने महायुती म्हणून लढवली होती. यामध्ये भाजपचे 22 आणि शिवसेनेचे 12 असे एकत्र महायुती म्हणून 34 सदस्य निवडून आले होते. परंतू बहुमतासाठी 46 ही संख्या जमवण्यात भाजपाला अपयश येत असतानाच शिवसेनेने कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांच्या सोबतीने महापौर पदासाठी जुळवाजुळव सुरू केली. त्याच दरम्यान विलास पाटील यांना आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केल्याने भाजपा आणि शिवसेना यांच्यातील वितुष्ट समोर आले. त्यानंतर भाजपाने महापौर पदासाठीची निवडणूक लढवत असल्याचे घोषित केले. त्या पाठोपाठ शिवसेना पक्षाने सुद्धा महापौर आणि  उपमहापौर पदाची निवडणूक लढवत असल्याचे स्पष्ट केले आहे.

नक्की वाचा - Mumbai Pune Expressway : गॅस टँकर अपघातानंतर वसूल केलेला टोल परत मिळणार? कंपनीने काय सांगितलं?

एकाही पक्षाला बहुमत नाही...


भिवंडीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने अनेकांकडून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने भिवंडी पालिका महापौर आणि उपमहापौर पदासाठीच्या दोन्ही निवडणुका शिवसेना लढवत आहे. शिवसेना पक्षाचा हा निर्णय भाजपला कळवण्यात आला आहे. प्रयत्न तर दोघांकडून सुरू होते. अंतिम निर्णय होऊ न शकल्याने भाजपा त्यांच्या पद्धतीने निवडणूक लढवेल तर शिवसेना आपल्या पद्धतीने निवडणूक लढवणार आहे. आमच्या सोबत विलास पाटील आले असताना त्यांना अटक झाली. त्यानंतर ही पक्षाने भूमिका ठाम ठेवली असून उमेदवार कोण असेल हे उद्या पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडून ज्यांचे नाव येईल ते उमेदवार असतील अशी माहिती पक्षनेते प्रकाश पाटील यांनी दिली.
 

Topics mentioned in this article