Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील ३ फेब्रुवारी (मंगळवारी) रोजी खोपोली हद्दीत एका टँकरचा अपघात झाला होता. यामुळे प्रवाशांचा तब्बल ३२ तास खोळंबा झाला होता. प्रोपलिन गॅसने भरलेला टँकर पलटल्याने मुंबईला जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. प्रवाशांना तासन् तास गाडीत बसून राहावं लागलं. महिलांना तर मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला होता. याशिवाय अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र भीषण परिस्थितीतही कंपनीकडून टोल वसूल केला जात होता.
वसूल केलेला टोल पुन्हा मिळणार?
यादरम्यान मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ३२ तासांचा खोळंबा झाला. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला होता. अशा परिस्थितीत खालापूर टोल नाका येथे टोल वसूल केला जात होता. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रवाशांना टोल परत करा असं आवाहन केलं होतं. यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी प्रवाशांना टोलचे परत करण्याबाबत खालापूर टोल नाका येथे MSRDC, IRB आणि वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. दरम्यान टोलचे पैसे परत करण्यासाठी IRB कंपनीने आश्वासन दिलं आहे. या काळात ज्यांनी टोल भरला असेल त्यांना रिफंड करण्यात येणार आहे.
अचानक उद्भवलेल्या या अपघातानंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सुविधांची वानवा होती. महिला, लहान मुलांचा नाहक त्रास सहन करावा लागला होता. त्यांच्या खाण्या-पिण्याचे हाल झाले. तर जवळ स्वच्छतागृह उपलब्ध नसल्याने सर्वच प्रवाशांना त्रास सहन करावा लागला होता.
राज ठाकरेंची पोस्ट...
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. आणि यानंतर नेहमीप्रमाणे सरकारकडून या प्रकरणाच्या फक्त चौकशीचे आदेश दिले गेले. "स्व. बाळासाहेबांच्या प्रेरणेतून हा द्रुतगती मार्ग उभा राहिला, त्याला २४ वर्ष उलटली. पण या काळात काय काय आपत्ती येऊ शकते ना याचा विचार केला गेला ना संपूर्ण रस्ता उत्तम दर्जाचा राहील हे पाहिलं गेलं. मधल्या काळात एकच गोष्ट तत्परतेने केली गेली ती म्हणजे टोल वसुली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं टोलचं आंदोलन हे टोल घेण्याच्या बाबतीतलं नव्हतंच. ते होतं जर टोल घेता, तर मग सरकार, टोल वसूल करणारी कंपनी काय सुविधा प्रवाशांना देते याबद्दलचं. कालच्या घटनेनंतर हाच प्रश्न आहे की, रस्ता बांधला आणि टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का?" असंही ते म्हणाले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world