भुपेंद्र अंबवणे
निसर्गाच्या किमयेपुढे अनेकदा विज्ञानही थक्क होते. असाच काहीसा धक्कादायक आणि कुतूहल निर्माण करणारा प्रकार भिवंडी तालुक्यातील दुगाड फाटा परिसरातील साईगाव अस्नोली येथे समोर आला आहे. येथील एका शेतकऱ्याच्या अंगणात असलेल्या आठ वर्ष जुन्या आंब्याच्या झाडाला चक्क शिताफळं लागल्याचे पाहायला मिळत आहे. यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. चक्क आंब्याच्या झाडावर शिताफळं लगडलेली दिसत आहेत. या 'निसर्ग चमत्कारा'ची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली आहे. ते पाहण्यासाठी ही साईगावात गर्दी होत आहे.
भिवंडीतल्या साईगाव अस्नोली येथील व्यावसायिक शेतकरी जयेश पटेल यांच्या घरासमोर आठ वर्षांपूर्वी आंब्याचे एक झाड लावण्यात आले होते. 2 मे रोजी या झाडाखाली काही मुले खेळत असताना, त्यांना आंब्याच्या फांद्यांमध्ये काहीतरी वेगळे दिसले. हा आंबा नक्कीच नाही हे त्यांना समजले होते. नीट पाहिल्यावर आंब्याच्या झाडाला शिताफळ लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. मुलांनी तात्काळ ही बाब घरातील मोठ्या माणसांना सांगितली. सुरुवातीला कोणाचाही विश्वास बसला नाही, मात्र प्रत्यक्ष पाहणी केल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जितेंद्र भोईर यांनी हा प्रकार कॅमेरात कैद केला आहे. हे आंब्याचे झाड सध्या फळांनी लगडले असून, त्यातच शिताफळही डोलत आहे. हे दृश्य पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. वनस्पतीशास्त्राच्या दृष्टीने हे ग्राफ्टिंगमुळे झाले की खरोखरच निसर्गाचा चमत्कार आहे, याबाबत आता तज्ज्ञांमध्ये चर्चा रंगू लागली आहे. मात्र हा चमत्कार पाहाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
हा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर याबाबत माहिती सर्वांना मिळाली. हा चमत्कार आहे का असा प्रश्न लोक उपस्थित करत होते. अनेकांना तर यावर विश्वासच बसत नव्हता. त्यामुळे प्रत्यक्ष पाहण्यासाठी लोक या ठिकाणी येत होते. त्यांचा डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. पण हे सत्य होते. आंब्याच्या झाडाला चक्क शिताफळ लागलं होतं. आता हे कसं शक्य झालं याच्या वेगवेगळ्या चर्चा गावात रंगल्या आहेत. काहांनी हा निसर्गाचा चमत्कार वाटत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world