Mumbai Shocking News : मुंबईच्या पूर्व उपनगरातील सर्वात उच्चभ्रू आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या वडाळा येथील भक्ती पार्क वसाहतीला सध्या प्रदुषणाचा विळखा बसला आहे. 20 एकरमध्ये वसलेल्या या वसाहतीत सुंदर बाग तर आहेच, शिवाय अटल सेतुलाही कनेक्टेड आहे. त्यामुळे हा परिसर मुंबईतील सुंदर ठिकाणांपैकी एक मानला जातो. परंतु, मागील काही दिवसांपासून येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI)300 च्या पुढे गेला आहे. या दूषित वातावरणामुळे येथील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.
2 वर्षांपासून या ठिकाणी सिमेंट मिक्सिंग प्लांटचं काम सुरु
मागील 2 वर्षांपासून या ठिकाणी सिमेंट मिक्सिंग प्लांटचं काम सुरु झाल्याने प्रदुषण वाढलं आहे, असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे.फ्री-वेच्या प्रवेशद्वारावर असलेल्या या प्लांटमुळे या भागात धुळीचे कण पसरतात. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) मे 2024 मध्ये हे प्लांट बंद करण्याचे आदेश दिले होते. परंतु,यासंबंधीत असलेले सर्व नियम मोडून काही दिवसांतच हा प्लांट पुन्हा सुरु झाला. 230 चौरस मीटरवर पसरलेल्या प्लांटमधून सरकारी प्रकल्पांसाठी आणि बीडीडी चाळ पुनर्विकासासाठी सिमेंट पुरवले जात असले तरी त्यासाठी स्थानिक नागरिकांचं आरोग्य धोक्यात घालणं चुकीचं आहे,असं येथील नागरिक म्हणतात.
नक्की वाचा >> निवडणुकीच्या निकालादिवशीच मध्य रेल्वेचा Mega Block! कल्याण-ठाणे दरम्यान मोठा बदल, 'या' गाड्या उशिराने पोहोचणार
रहिवासी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवणार
फक्त हा सिमेंट प्लांटच नव्हे, तर वडाळा टीटी परिसरातील अवैध भंगार उद्योग,कचरा जाळणे आणि धातू वितळवण्याच्या कामामुळे हवेची गुणवत्ता खराब झाली आहे. हवेत विषारी घटक पसरत आहेत. मेट्रो 4 चे काम आणि कस्टम्स ऑफिसर्स कॉलनीच्या बांधकामामुळे येथील परिसरात धुळीचे कण मोठ्या प्रमाणात पसरतात. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याने येथील रहिवाशांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिण्याची मोहिम हाती घेतली आहे. गेल्या एक वर्षात या भागात एकदाही हवेचा दर्जा उत्तम राहिलेला नाही, ही चिंतेची बाब आहे.