Shivsena UBT Dussehra Melava: दसरा मेळाव्याचं '9' अंकांचं कनेक्शन, भाजप नेत्याने खर्चाचा आकडाच सांगितला

ठाकरे गटाचा दसरा मेळावा एका दिवसावर असताना, या मेळाव्याच्या कथित खर्चावरून भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे गटावर ट्विटरच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

BJP on Shivsena UBT Dussehra Melava: शिवसेनेचा दसरा मेळावा राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेचा विषय असते. शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतरही पक्ष आणि चिन्ह गमावल्यानंतरही ठाकरेच्या दसरा मेळाव्याचं महत्त्वा काही कमी झालेलं नाही. यंदा तर ठाकरेंचा दसरा मेळावा खास असणार आहे. कारण मुंबई महापालिका निवडणुका आणि राज ठाकरे यांच्याशी वाढलेली जवळीक यामुळे दसरा मेळावा खास आहे.

मात्र ठाकरे गटाचा दसरा मेळावा एका दिवसावर असताना, या मेळाव्याच्या कथित खर्चावरून भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे गटावर ट्विटरच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे. दसरा मेळाव्याच्या नियोजनासाठी तब्बल 63 कोटी रुपयांचा खर्च केला जात असल्याची माहिती गटाच्या सूत्रांनीच दिल्याचे सांगितलं.

केशव उपाध्ये यांचं ट्वीट

केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत म्हटलं की, "नऊ हा ‘आकडा' लाभदायक असल्याचे कुणीतरी सांगितल्यापासून उबाठाचे सगळे व्यवहार या आकड्यांवर अवलंबून असतात. निवडणुकीतील उमेदवारांच्या संख्येची बेरीज नऊ हवी, टक्केवारी नऊपेक्षा कमी नसावी, इतकेच काय, दोघा भावांमध्ये असलेल्या ३६ च्या आकड्याची बेरीजही नऊ असावी याची नेहमीच काळजी घेणाऱ्या या गटाचा दसरा मेळाव्याचे नियोजनही ६३ कोटींच्या घरात असणार आहे. गटाच्या गोटातील सूत्रांनी दिलेली ही अत्यंत खात्रीलायक माहिती!!

"मेळाव्यासाठी तब्बल ६३ कोटीचे नियोजन झाल्याचे या गटातील नेत्यानेच हर्षोल्हासित होत सांगितले. सभा ठिकाण, स्टेज सजावट, जाहिराती, सोशल मिडीया, त्याशिवाय लोकांना आणायला गाड्या, गाडीत बसून लोकांनी मेळाव्याला यावे म्हणून, शिवाय त्यांच्या वडापाव, चहापाण्याची व्यवस्था……. असं सगळं मिळून हे ६३ कोटी लागणार आहेत म्हणे. या ६३ कोटी मध्ये अतीवृष्टीच्या संकटात सापडलेल्या मराठवाड्यात किती गावातील शेतकऱ्यांना मदत झाली असती? किती घरे वसवली गेली असती?", असं सवाल देखील उपाध्ये यांनी उपस्थित केला.

"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना लोक स्वतःहून उत्साहात यायचे. तेव्हा सेना प्रमुखाचं विचारांच सोनं असायच. आता तशी परिस्थिती नाही! मागचे काही मेळावे आठवा… मिंधे, खंजीर, माझा पक्ष चोरला, चिन्ह चोरलं ही रडगाणी ऐकायला एकट्या गटातून गर्दी पण गोळा होत नाही म्हणून ३६ चा आकडा मोडून ६३ ची गोळाबेरीज करण्याचा हा आटापीटा!", अशी टीकाही केशव उपाध्ये यांनी केली.

"नाकी नऊ आले म्हणतात ते हेच!! रडगाण्याचे तेच बेसूर सूर आळवायला खरंच ६३ कोटीचा मेळावा घ्यायची गरज आहे का? हवं तर उद्धव ठाकरेंच्या नावाने मराठवाड्यात मदत करा पण हे ६३ कोटी महाराष्ट्राच्याच उभारणीत लावा…", असं देखील केशव उपाध्ये यांनी म्हटलं.

Topics mentioned in this article