'लाडकी बहीण' योजना मतांसाठीचा जुगाड? भाजप आमदारानेच सांगितली खरी 'भानगड'

आम्ही एवढी मोठी भानगड कशाला केली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना का आणली? याबाबत भाजप आमदार टेकचंद सावरकर यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

'मुखमंत्री लाडकी बहीण' योजना राज्य सरकारच्या लोकप्रिय योजनांपैकी एक आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारचा हा मास्टरस्ट्रोक मानला जात आहे. राज्यातील महिला आणि मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी ही महत्त्वाची योजना आहे. मात्र या योजनेमागची खरी 'भानगड' समोर आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना का आणली? याबाबत भाजप आमदार टेकचंद सावरकर यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. विजय वडेट्टीवार यांनी देखील याबाबत ट्वीट केलं आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भाजप आमदार टेकचंद सावरकर यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना म्हटलं की, आम्ही एवढी मोठी भानगड कशाला केली, प्रामाणिकपणे सांगा. ज्यावेळी तुमच्या घराजवळ निवडणुकीची मतपेटी येईल त्यावेळी आमची 'लाडकी बहीण' कमळाला मतदान करेल. यासाठीच तर आम्ही हा जुगाड केला आहे. बाकी सगळे खोटं बोलले असतील, मात्र मी खरं बोलत आहे. बोलायचं एक आणि करायचं एक असं आम्ही करत नाही, असं आमदार टेकचंद सावरकर यांनी म्हटलं. 

(नक्की वाचा- लाडकी बहिण योजनेचा तिसरा हफ्ता कधी जमा होणार? तारीख आली समोर)

काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट करत म्हटलं की, अखेर महायुतीची भानगड पुढे आली! महायुतीला मतांचा दुष्काळ आहे, म्हणून लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे. भाजपच्या या आमदाराने मान्य केलं की महायुतीतील सर्व नेते खोटं बोलतात. लाडकी बहीण योजना माता भगिनींना लाभ देण्यासाठी नव्हे तर मत पेटीतून लाभ घेण्यासाठी आहे.

(नक्की वाचा-  लाडकी बहीण योजनेत घोटाळा, पठ्ठ्याने केलेला झोल पाहून सगळेच चक्रावले)

टेकचंद सावरकर यांचं स्पष्टीकरण 

भाजपचे कामठी येथील आमदार टेकचंद सावकर यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. लाडकी बहीण योजनेबद्दल मी असं म्हणालो आहे. मात्र मी भानगड म्हणालो नाही, तर योजना आहे असे म्हणालो. आपल्या भाषणाची क्लिप कापून कापून दाखवली आहे, असं टेकचंद सावरकर यांनी म्हटलं आहे.