भुपेंद्र अंबवणे, भिवंडी
Bhiwandi Crime News: भिवंडीतून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. खारबाव चिंचोटी रस्त्यावरील खार्डी गावात भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि त्याचा सहकारी तेजस तांगडी यांची धारदार शस्त्रांनी निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून, हल्लेखोरांनी अचानक हल्ला करत दोघांना संपवले.
प्रफुल्ल तांगडी आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत 'जे डी टी इंटरप्रायसेस' या त्याच्या कार्यालयात बसले होते. रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास, चार ते पाच हल्लेखोर अचानक तिथे आले आणि त्यांनी धारदार शस्त्रांनी प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. हल्लेखोरांनी हल्ल्यानंतर तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला.
(नक्की वाचा- बॉयफ्रेंडसोबत पळण्यासाठी सर्व हद्द ओलांडली, आईनं दाबला 5 महिन्याच्या मुलीचा गळा)
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांची संख्या 4 ते 5 होती. या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेतील एक धक्कादायक बाब म्हणजे, सुमारे एक वर्षापूर्वीही प्रफुल्ल तांगडी यांच्यावर असाच जीवघेणा हल्ला झाला होता. त्या हल्ल्यातून ते बचावले होते. मात्र, आजच्या हल्ल्यात हल्लेखोरांनी त्यांचा जीव घेतला.
(नक्की वाचा : मुलाच्या हव्यासापोटी बापाने 1 वर्षाच्या मुलीला विषारी बिस्किट खाऊ घातले! वाचून उडेल थरकाप )
प्रफुल्ल तांगडी भाजप युवा मोर्चाचे एक सक्रिय कार्यकर्ता आणि जिल्हा उपाध्यक्ष होते. त्यांची राजकीय पार्श्वभूमी असल्याने या हत्येमागे नेमके कोणते कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. ही हत्या वैयक्तिक वादातून झाली आहे की राजकीय वैमनस्यातून, याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणातील पुढील तपास सुरू असून, पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके तयार केली आहेत.