Mumbai News: मुलुंड येथील डंपिंग ग्राऊंड अखेर स्वच्छ झाल्यावर त्या जागेचा वापर कशासाठी करावा, याबद्दल एक मोठा आणि महत्त्वाकांक्षी प्रस्ताव समोर आला आहे. देशातील व्यावसायिक गोल्फर्सची अधिकृत संस्था असलेल्या प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाने (PGTI) या जागेवर गोल्फ कोर्स विकसित करण्याची योजना आखली आहे. त्यासाठी त्यांनी अभ्यास करण्याची परवानगी मुंबई महानगरपालिकेकडे (BMC) मागितली होती.
बीएमसीची सशर्त मंजुरी
महानगरपालिकेने बुधवारी पीजीटीआयला (PGTI) या अभ्यासाला परवानगी दिली आहे, पण त्यासोबतच काही कठोर अटी देखील घातल्या आहेत. बीएमसीने स्पष्ट केले आहे की, सर्वेक्षण आणि अभ्यास करताना जो काही कचरा किंवा मलबा निघेल, त्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था पीजीटीआयला स्वतः करावी लागेल आणि हा कचरा कोणत्याही नागरी जमिनीवर टाकता येणार नाही. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
(नक्की वाचा- साईबाबा आणि बालाजी भक्तांसाठी खूशखबर! शिर्डी-तिरुपती एक्सप्रेस सुरु, राज्यात 11 ठिकाणी थांबणार गाडी)
मंजुरी केवळ डंपिंग ग्राऊंडच्या आत तपासणीसाठी
बायो मायनिंग इंडिया प्रा. लि. कंपनीकडून सध्या डंपिंग ग्राऊंड साफ करण्याचे 731 कोटी रुपयांचे काम सुरू आहे. या कामात कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण होऊ नये, यावर बीएमसीने भर दिला आहे. एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, ही मंजुरी केवळ डंपिंग ग्राऊंडच्या आत व्यवहार्यता तपासणीसाठी मर्यादित आहे. "या परवानगीचा अर्थ कोणत्याही बांधकाम, विकास किंवा इतर गतिविधीसाठी अंतिम मंजुरी नाही. पुढील कोणत्याही प्रस्तावासाठी सक्षम अधिकाऱ्यांकडून स्वतंत्र आणि स्पष्ट मंजुरी घेणे आवश्यक असेल," असेही बीएमसीने सांगितले आहे.
बायोमायनिंग प्रकल्पाचे काम 2019 पासून डंपिंग ग्राऊंडवर सुरू आहे. एकूण 78 लाख टन कचऱ्यापैकी, आतापर्यंत 58 लाख टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे. उर्वरित कचऱ्यावर एका वर्षात प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर उपलब्ध होणाऱ्या 64 एकर जागेवर गोल्फ कोर्स विकसित करण्यास पीजीटीआय उत्सुक आहे.
(नक्की वाचा- Dombivli News: कल्याण-डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! कोळेगावमध्ये 21 डिसेंबरपर्यंत वाहतूक मार्गात बदल)
स्थानिक आमदारांकडून स्वागत
मुलुंडचे भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी बीएमसीच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. गोल्फ कोर्सचा प्रस्ताव त्यांनीच यापूर्वी मांडला होता. कोटेचा म्हणाले, गोल्फ कोर्स तयार झाल्यास या परिसराच्या आर्थिक विकासाला हातभार लागेल. तसेच, स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळतील आणि नागरिकांना स्वच्छ, प्रदूषणमुक्त वातावरण मिळेल.