पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकुन अतिशय दुःख झाले. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत. रविवारी दुपारी ही दुर्घटना घडली. त्यानंतर एकच खळबळ उडाली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शोक संदेशात मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि संबधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे असं फडणवीस म्हणाले. काही जण वाहून गेल्याने त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. विभागीय आयुक्त घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत असं ही त्यांनी सांगितलं.
ट्रेंडिंग बातमी - Pune Bridge collapses: कुंडमळ्यात इंद्रायणी नदीवरील पूल कसा कोसळला? कारण आलं समोर
घटनास्थळी एनडीआरएफला पाचरण करण्यात आले आहे. मदत कार्याला तातडीने वेग देण्यात आला आहे. 6 जणांना आतापर्यंत वाचविण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 32 लोक जखमी झाले, त्यापैकी 6 गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती ही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
दरम्यान दुर्घटना ठिकाणी अजूनही बचाव कार्य सुरू आहे. त्या ठिकाणी आता काळोख झाला आहे. तरीही वाहून गेलेल्यांना शोधण्याचे काम सुरू आहे. जो पूल कोसळला तो अतिशय जुना होता. त्यावरून वाहतूक ही बंद करण्यात आली होती. तरी ही मोठ्या प्रमाणात लोक त्या पुलावर होते. पुलाला वजन सहन न झाल्याने तो अखेर कोसळला. त्यावेळी काही दुचाकी ही या पुलावर होत्या.