Budhwar Peth Story : 'दिसतं तसं नसतं...' अशी एक म्हण आहे. बऱ्याचदा तुमच्या डोळ्यांना एखादी गोष्ट जशी दिसते ती प्रत्यक्षात तशीच असते असं नाही. बऱ्याच गोष्टींमागची पार्श्वभूमी हादरवणारी असते. वेश्यावस्तीचा झगमगाट पाहिला की अनेक जण त्याचा तिरस्कार करतात. मात्र प्रत्यक्षात त्या वस्तीच्या आतील संघर्ष आपल्या लक्षात येत नाही. बुधवार पेठेतही अशा अनेक संघर्षमय गोष्टी दडलेल्या आहेत. ज्या साध्या डोळ्यांनी दिसणं जरा अशक्यच.
बुधवार पेठेतील 'त्या' वस्तीत सफाई कामगार का जात नाहीत?
राज्याचं सांस्कृतिक शहर असलेल्या पुण्यात एक गल्ली अशीही आहे जिथं पालिकेचे सफाई कामगार जात नाहीत. हे वाक्य अनेकांना खटकू शकतं. मात्र हे खरं असल्याचं तेजस्वी सेवेकरी यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, मनपाचे सफाई कामगार, लक्ष्मी रोड, शिवाजी रोड आणि शुक्रवार पेठचा रस्ता हा भाग स्वच्छ करतात आणि निघून जातात. मात्र बुधवार पेठेतील कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची तेथील कचरा कोणी स्वच्छ करायचा यासाठी तेथे राहणाऱ्या महिला अनेक वर्षांपासून झगडत होत्या. अनेकदा महिला एखाद्या व्यक्तीला जास्तीचे पैसे देऊन वस्तीतील परिसर स्वच्छ करून घेत होत्या. मात्र तो कचरा उचलायचा कोणी, रस्ते झाडायचे कोणी याबाबत मोठा प्रश्न होता. बुधवार पेठेत चांगली लोक जात नाहीत, म्हणून सफाई कामगारही तेथे येत नाहीत, असंही सेवेकरी यावेळी म्हणाल्या.
वस्तीतील महिलांनाच सफाई कामगार म्हणून का घेत नाहीत?
सेवेकरी यांनी सांगितलं की, पूर्वी आम्ही मनपाकडे इथल्याच महिलांना सफाई कामगार म्हणून का घेत नाही अशी विचारणा केली होती. मात्र या महिला कष्टाची कामं करू शकत नाहीत अशी काहींची समज होती. त्यानंतर ज्या १६ महिलांना सेक्स वर्क सोडायचं होतं अशा महिला सफाई कामगार म्हणून काम करू लागल्या. कामगार म्हणून त्यांना कंपनीकडून सर्व सुविधा मिळाल्या. आर्थिकदृष्ट्या सशक्त पर्याय मिळाल्यामुळे त्या वेश्या व्यवसाय सोडू शकल्या. परिसर स्वच्छ होऊ लागला. त्यामुळे बुधवार पेठेतील रंगरुप तुम्हाला बदलल्याचं दिसेल, असंही सेवेकरी यांनी सांगितलं.
(वरील लेख सोशल मीडियावरील माहितीवर आधारित आहे. NDTV मराठी यातून कोणताही दावा करीत नाही.)