संजय तिवारी, नागपूर
नागपूर हिंसाचारातील अटकेत असलेला मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालवला जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. नागपूर महानगरपालिकेने अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी फहीम खानला नोटीस बजावली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नागपूरच्या यशोधरानगरच्या संजय बाग कॉलनीत फहीम खानचं घर आहे. याठिकाणी घर बांधताना फहीम खान याने मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केल्याचं नागपूर महापालिक प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या प्रकरणी आता मनपा प्रशासनाकडून फहीम खानला नोटीस बजावण्यात आलेली आहे.फहीम खानच्या घराचे सुमारे 900 चौरस फुटाचे बांधकाम अनधिकृत आहे.
(नक्की वाचा- मोदींना भेटले, प्रकाशझोतात आले, आता दंगलीसाठी अटक, 'ते' हमीद इंजिनिअर कोण?)
याबाबत महानगरपालिकेने नोटीस बजावली असून बुलडोझर कारवाई होणार असल्याचं बोलल जात आहे. शहरात लोकांच्या धार्मिक भावना भडकवून हिंसाचार घडवणे, त्यामुळे फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा लावण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना अलीकडेच जिथे आवश्यक असेल तिथे बुलडोझर चालेल असे म्हटले होते.
दंगेखोरांकडून नुकसान वसूल करणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, नागपूरच्या हिंसाचारात ज्यांचं नुकसान झालं, त्या सर्वांना नुकसान भरवाई येत्या 3-4 दिवसात दिली जाईल. जे नुकसान झालं आहे, ते दंगेखोरांकडून वसूल केलं जाईल. दंगेखोरांनी पैसे भरले नाही तर त्यांची मालमत्ता विकली जाईल.
(नक्की वाचा- Sanjay Raut: '...त्यावेळी राणे कुटुंबीयांनीच उद्धव ठाकरेना फोन केले',संजय राऊतांनी सर्वच काढलं)
राज्यात या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. नागपूरचा शांततेचा इतिहास आहे. 1992 नंतर अशी मोठी घटना नागपुरात कधीही घडली नव्हती. आता दंगेखोराना सरळ केले नाही तर त्यांना सवय लागेल. त्यामुळे आरोपींवर कुठलीही दयामाया दाखवली जाणार नाही, असा इशाराच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.