Railway News Update: मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गजबजलेल्या आणि महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या 10.8 किलोमीटरच्या ठाणे-कल्याण रेल्वे कॉरिडॉरवरील तीव्र वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्रस्तावित 7 वी आणि 8 वी लाईन प्रकल्पांतर्गत, रेल्वे प्रशासनाने काही निवडक ठिकाणी भुयारी रेल्वे मार्ग तयार करण्याची शक्यता तपासली जात आहे.
जागेअभावी भुयारी मार्गाची गरज
ठाणे-कल्याण हा मार्ग दररोज सुमारे 1000 गाड्यांची वाहतूक हाताळतो आणि लाखों प्रवाशांसाठी इंटरचेंज झोन म्हणून काम करतो. मुंबई महानगर प्रदेशाच्या वाढत्या विस्तारामुळे या भागात जमिनीची उपलब्धता एक मोठी अडचण बनली आहे. त्यामुळे, विशेषतः डोंबिवलीच्या आसपासच्या दाट लोकवस्तीच्या ठिकाणी आडवा विस्तार करणे शक्य नसल्याने, भुयारी मार्ग हा दीर्घकालीन ट्रॅफिक कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा उपाय ठरू शकतो, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सविस्तर सर्वेक्षण सुरू
मध्य रेल्वे (CR) अधिकाऱ्यांनी सांगितलं की, कल्याण-ठाणे कॉरिडॉरवर नवीन रेल्वे लाईन्स कशा आणता येतील, याचा अभ्यास करत आहोत. एका थर्ड-पार्टी एजन्सीची अंतिम स्थान सर्वेक्षण (Final Location Survey) करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. हा अभ्यास सध्या प्राथमिक टप्प्यात आहे. अहवालानुसार, FLS मध्ये भुयारी मार्गांची गरज आहे की नाही, याचे मूल्यांकन केले जाईल. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, FLS अहवाल 2026 च्या मध्यापर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे. हिंदुस्थान टाईम्सने याबाबतचं सविस्तर वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
(नक्की वाचा- Jalgaon News: नको तेच घडलं! बेपत्ता 9 वर्षीय मुलीचा मृतदेह 3 दिवसांनी सापडला; चाळीसगाव हादरलं)
कल्याण-ठाणे मार्गाचे महत्त्व
- ठाणे, दिवा आणि कल्याण ही स्थानके अत्यंत महत्त्वाची आणि वर्दळीची आहेत.
- ठाणे स्टेशन मुख्य लाईनला पनवेलकडे जाणाऱ्या ट्रान्स-हार्बर कॉरिडॉरशी जोडते.
- कल्याण येथून मार्ग कसारा आणि कर्जत-खोपोलीकडे विभागतो.
- दिवा उपनगरीय सेवांना रोह्यापर्यंत जोडतो.
2022 मध्ये ठाणे आणि दिवा दरम्यानच्या 5 वी आणि 6 वी लाईनचे काम पूर्ण झाले आहे, ज्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी, समस्येचे पूर्ण निराकरण झालेले नाही, अशी कबुली अधिकाऱ्यांनी दिली. सध्या ठाणे-कल्याण दरम्यान सुमारे 1200 उपनगरीय लोकल सेवा धावतात. दिवा स्टेशनवर रोजच्या 894 लोकल गाड्यांपैकी 70% ते 75%* गाड्या थांबतात. यामुळे दिवा येथील लेव्हल क्रॉसिंग दिवसातून सुमारे 39 वेळा बंद करावे लागते. ज्यामुळे रेल्वे वेळापत्रक आणि रस्ते वाहतूक दोन्ही विस्कळीत होते.
(नक्की वाचा- Pune News: पाठलाग, शिवीगाळ अन् कारची तोडफोड; पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर जोडप्यासोबत भयंकर घडलं; कारण...)
हा प्रस्तावित प्रकल्प उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांची वाहतूक पूर्णपणे वेगळी करण्याच्या मोठ्या धोरणाचा भाग आहे. मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) चा विस्तार अतिरिक्त प्लॅटफॉर्मसह करण्याची आणि परळ येथे नवीन टर्मिनस विकसित करण्याची योजना आखत आहे. ज्यामुळे CSMT आणि दादरवरील ताण कमी होईल. भुयारी लाईन्समुळे ठाणे-कल्याण मार्गावरील प्रवासाला नवा मार्ग मिळेल. मात्र या प्रकल्पाला प्रत्यक्ष मूर्त स्वरूप येण्यासाठी अनेक वर्षे लागतील, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.