मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आटगाव स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू करण्यासाठी आणि जुने पॅनल काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे शनिवारी दुपारी 2 वाजल्यापासून ते रविवारी सकाळी 3 वाजेपर्यंत कसारा ते आसनगाव दरम्यान तब्बल 14 तासांचा विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
कसारा लोकल आसनगावपर्यंतच धावणार
या 14 तासांच्या मेगा ब्लॉकमुळे आसनगाव ते कसारा दरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. याचा मोठा फटका उपनगरीय प्रवाशांना बसणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) वरून सकाळी 11.42 ते रात्री 8.44 दरम्यान सुटणाऱ्या सर्व कसारा लोकल आसनगाव येथेच अर्ध्यावर थांबविल्या जातील.
(नक्की वाचा- मारुती सुझुकीचं ऐतिहासिक पाऊस, देशातील पहिली 'WagonR Flex Fuel' कार लाँच; शेतकऱ्यांना होणार फायदा)
काही लोकल गाड्या खडवली, टिटवाळा आणि कल्याण स्थानकांपर्यंतच चालवण्यात येणार आहेत. कसाराहून सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकल गाड्याही कसाराऐवजी आसनगाव स्थानकातूनच सुरू होणार असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागेल.
पंचवटी एक्स्प्रेससह 4 गाड्या रद्द, अनेक गाड्यांच्या मार्गात बदल
या विशेष ब्लॉकमुळे केवळ लोकल सेवाच नाही, तर लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावरही मोठा परिणाम झाला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 4 मेल/एक्स्प्रेस पूर्णपणे रद्द करण्यात आल्या असून, 11 गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.
(नक्की वाचा- Hero MotoCorp New Bike: हिरो मोटोकॉर्पचा मोठा धमाका! पेट्रोल किंवा चार्जिंगशिवाय धावणार बाईक)
रद्द करण्यात आलेल्या गाड्या
सीएसएमटी-धुळे एक्स्प्रेस, धुळे-सीएसएमटी एक्स्प्रेस तसेच प्रवाशांची आवडती पंचवटी एक्स्प्रेसच्या दोन्ही फेऱ्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. तर हजूर साहिब नांदेड-सीएसएमटी एक्स्प्रेस मुंबईपर्यंत न येता मनमाड येथेच थांबवण्यात येईल. तसेच हिंगोली डेक्कन जनशताब्दी एक्स्प्रेस नाशिक रोड स्टेशनपर्यंतच चालवण्यात येणार आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, ब्लॉक कालावधीत आवश्यक असेल तरच प्रवास करावा आणि प्रवासाला निघण्यापूर्वी गाड्यांचे सुधारित वेळापत्रक तपासून घ्यावे.