मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प; ओव्हरहेड वायरचा खांब वाकल्याने खोळंबा
अमजद खान, कल्याण
कल्याण-कसारादरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याची माहिती समोर येत आहे. सकाळपासून शहापूर आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसल्याचं दिसून येत आहे.
खडवली-वासिंददरम्यान रेल्वे रुळालगतची माती वाहून गेल्यानं ओव्हरहेड वायरचा खांब वाकला आहे. कसाऱ्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. रेल्वेकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचं काम हाती घेतलं आहे.
रेल्वेचे कर्मचारी खांब दुरुस्तीचं काम करत आहेत. थोड्यात वेळात खांब दुरुस्ती करुन वाहतूक सुरु होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. रेल्वे वाहतूक सुरू होण्यास आणखी 2 तास लागण्याची शक्यता आहे.
त्याआधी सकाळी मध्य रेल्वेच्या आटगाव-तानशेतदरम्यान रुळावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. तर वाशिंद रेल्वे स्थानकाजवळीही तांत्रिक बिघाड झाला होता. दोन्ही घटनांमुळे कल्याणहून कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती.