छत्रपती संभाजीनगर शहराच्या जटवाडा रस्ता परिसरातील ओहरगावचे माजी सरपंच दादा सांहू पठाण यांची काल दुपारी 11 जणांनी जमिनीच्या वादातून हत्या केली. या घटनेने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे, पठाण यांच्या कुटुंबातील महिला हल्लेखोरांसमोर हात जोडून विनवण्या करत असतानाही, या टोळीने लाठ्याकाठ्या आणि लोखंडी रॉडने हल्ला चढवला.
पठाण यांचे कुटुंब मूळ ओहरगावचे असून, त्यांच्या घरासमोरच त्यांची शेती आहे. काही अंतरावर शाळेजवळ त्यांची जमीन आहे. या जमिनीच्या शेजारून एक छोटी वाट जाते. सुरुवातीला आरोपींच्या टोळीने या छोट्या वाटेवरून वाद घालण्यास सुरुवात केली होती. मात्र, कालांतराने या टोळीची मजल इतकी वाढली की त्यांनी पठाण यांच्या संपूर्ण जमिनीवरच आपला दावा सांगण्यास सुरुवात केली. या कारणावरून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यात वाद सुरू होता.
(नक्की वाचा- Navi Mumbai: नवी मुंबई पुन्हा हादरली! खारघर आणि कोपरखैरणेतून पुन्हा दोन मुली बेपत्ता; आकडा 458 वर)
बुधवारी दुपारी पठाण यांनी आपल्या जमिनीचे सपाटीकरण करण्यासाठी एक जेसीबी बोलावला होता. काम सुरू असतानाच अचानक 11 जणांची टोळी तिथे आली आणि त्यांनी कामाला विरोध करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
महिलांना हात जोडले तरी मारहाण
टोळीने हल्ला चढवला, तेव्हा पठाण यांच्या कुटुंबातील महिलांनी हल्लेखोरांना हात जोडून वाद मिटवण्यासाठी विनंती केली. मात्र, त्यांच्याकडे लक्ष न देता त्यांनी दादा पठाण आणि त्यांच्या दोन मुलांवर लाठ्याकाठ्या, रॉड आणि लाथाबुक्क्यांनी भीषण हल्ला केला. या हल्ल्यात दादा पठाण यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर जखमा झाल्या, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
(नक्की वाचा- Accident News: मीरा रोडमध्ये खड्ड्यामुळे तरुणाचा बळी, पोलिसांनी मृत तरुणावरच केला गुन्हा दाखल)
11 जणांविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलिसांनी इम्रान खान मोईन खान पठाण, जमीर इनायत खान पठाण, मोसीन मोईन खान पठाण, अफरोज खान गयाज खान, अस्लम गयाज पठाण ऊर्फ गुड्डू, हैदर खान गयाज खान पठाण, समीर जमीर पठाण, उमेर जमीर पठाण, फुरकान अजगर पठाण, रामअवतार सागरमल साबू, मोईन इनायत खान पठाण या 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका आरोपीला बुधवारी रात्री पोलिसांनी अटक केली आहे. इतर सर्व आरोपी पसार असून त्यांना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world