एका 7 वर्षांच्या अल्पवयीन मुलाला फूस लावून धार्मिक स्थळी नेऊन त्याच्यासोबत अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या विकृत कृत्याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
नेमकी घटना काय?
पीडित मुलाच्या आईने जिन्सी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, ही घटना 1 जून रोजी सकाळी घडली. फिर्यादी महिलेचा 7 वर्षांचा मुलगा झोका पाहण्यासाठी गेला होता. त्याच वेळी तिथे राहणारा आरोपी उमेर शेख याने या लहान मुलाला जवळ बोलावले आणि फूस लावून आत नेले.
धार्मिक स्थळी आत नेल्यानंतर आरोपीने मुलाला स्वतःच्या मांडीवर बसवून त्याच्याशी अत्यंत अश्लील कृत्य केले. इतकेच नव्हे, तर मुलाला मांडीवर झोपवून त्याने घट्ट पकडून ठेवले. या अनपेक्षित आणि विकृत प्रकारामुळे लहान मुलगा प्रचंड घाबरून गेला. काही वेळानंतर आरोपीने त्याला मशिदीबाहेर सोडले आणि तो तिथून पसार झाला.
मुलाने घरच्यांना सांगितली आपबिती
भयावह प्रसंग अनुभवलेला मुलगा जेव्हा घरी परतला, तेव्हा तो प्रचंड घाबरलेल्या आणि मानसिक दडपणाखाली असलेल्या अवस्थेत होता. मुलाची ही गंभीर अवस्था पाहून त्याच्या आईला संशय आला. आईने त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, पीडित मुलाने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार रडत रडत सांगितला.
मुलाने दिलेल्या या धक्कादायक माहितीनंतर कुटुंबीयांनी तात्काळ जिन्सी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. या गंभीर प्रकरणाचा तपास करत असताना, मशिदीच्या परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले असता, मुलाने सांगितलेली सर्व घटना त्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाल्याचे स्पष्ट झाले. या भक्कम पुराव्याआधारे पोलिसांनी आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या.
आरोपीला 12 जूनपर्यंत पोलीस कोठडी
जिन्सी पोलिसांनी आरोपी उमेर शेख याच्यावर कडक कलमांन्वये आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची गुन्ह्याची पार्श्वभूमी आणि पुढील तपास लक्षात घेऊन त्याला 12 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world