- मोसीन शेख, प्रतिनिधी
Chhatrapati Sambhajinagar News: गरम भाजीत पडल्यामुळे गंभीररीत्या भाजलेल्या दोन वर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील मुद्देशवाड गाव येथे ही धक्कादायक घटना घडली. ऋतुजा श्रावण राजपूत असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे, या घटनेमुळे संपूर्ण मुद्देशवाड गावावर शोककळा पसरली आहे.
दोन वर्षांच्या मुलीसोबत नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, 19 जुलै रोजी ऋतुजा राजपूत ही चिमुकली आपल्या राहत्या घरी खेळत होती. खेळता खेळता अचानक ती घरात तयार करून ठेवलेल्या गरम भाजीच्या भांड्यात पडली. भाजी गरम असल्याने चिमुकली गंभीररीत्या भाजली गेली.
तिच्या रडण्याचा आवाज ऐकून कुटुंबीयांनी तत्काळ धाव घेतली आणि तिला गंभीर अवस्थेत जवळच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून तिला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.
(नक्की वाचा: पिंपरी-चिंचवडमध्ये 'आय फ्लू'चा उद्रेक! पावसाळ्यात डोळ्यांच्या संसर्गाचे रुग्ण वाढले; डॉक्टरांचा गंभीर इशारा)
घाटी रुग्णालयात तिच्यावर गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय उपचार सुरू होते. पण भाजण्याचे प्रमाण जास्त असल्याने आणि प्रकृतीत सुधारणा न झाल्याने अखेर उपचारादरम्यान शुक्रवारी (31 जुलै) तिची प्राणज्योत मालवली.
(नक्की वाचा: Schemes for Girls: लाडक्या लेकीचं भविष्य करा सुरक्षित! 5 जबरदस्त सरकारी योजना; कसा होतो फायदा? वाचा..)
लहान मुले घरात असताना पालकांनी काय काळजी घ्यावी?
घरात किंवा स्वयंपाकघरात खेळताना लहान मुलांच्या बाबतीत किरकोळ निष्काळजीपणाही मोठ्या घटनेस कारणीभूत ठरू शकतो. अशा घटना टाळण्यासाठी पालकांनी खालील गोष्टींची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे:
गरम पदार्थ आणि भांडी मुलांपासून दूर ठेवा : किचनमध्ये तयार केलेले गरम वरण, भाजी, दूध किंवा उकळते पाणी नेहमी उंचावर किंवा लहान मुलांचा हात पोहोचणार नाही अशा ठिकाणीच ठेवावे.
जमिनीवर गरम भांडी ठेवणे टाळा: स्वयंपाक झाल्यानंतर गरम भांडी थेट जमिनीवर ठेवू नका. जर ठेवावी लागलीच तर त्या भांड्यांवर भक्कम झाकण ठेवा आणि मुलांवर सतत लक्ष ठेवा.
किचन क्षेत्रात मुलांच्या वावरावर नियंत्रण: स्वयंपाक करत असताना किंवा गरम पदार्थ खाली उतरवत असताना लहान मुलांना किचनपासून दूर ठेवावे.
सुरक्षा उपाय आणि सतर्कता: घरातील इतर सदस्यांनीही लहान मुलांवर सतत लक्ष ठेवणे गरजेचे आहे. खेळताना मुले अचानक अशा ठिकाणी जाऊ शकतात जिथे धोक्याची शक्यता असते.