सुरज कसबे, पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरात सध्या पावसाळ्यातील वाढती आर्द्रता आणि सतत बदलणाऱ्या हवामानामुळे आरोग्य समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यातच आता 'आय फ्लू' म्हणजेच कन्जंक्टिव्हायटिस (Conjunctivitis) या डोळ्यांच्या संसर्गजन्य आजाराच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. घरोघरी आणि विशेषतः लहान मुलांमध्ये या संसर्गाचा प्रसार वेगाने होत असल्याने आरोग्य प्रशासन आणि नेत्ररोगतज्ज्ञांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
'आय फ्लू'ची प्रमुख लक्षणे
नेत्ररोगतज्ज्ञांच्या मते, हा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे वेगाने पसरतो. त्यामुळे खालील लक्षणे आढळल्यास अजिबात दुर्लक्ष करू नये.
- डोळ्यातील पांढऱ्या भागावर लालसरपणा किंवा गुलाबी रंग येणे.
- डोळ्यांमध्ये सतत जळजळ होणे, खाज सुटणे किंवा टोचल्यासारखे वाटणे.
- डोळ्यांमधून पाणी वाहणे आणि चिपड (Pus) येणे.
- विशेषतः सकाळी उठल्यानंतर दोन्ही डोळ्यांच्या पापण्या एकमेकांना चिकटणे.

(नक्की वाचा- Ajinkya Rahane: क्रिकेटमधून निवृत्तीनंतरही रहाणेला BCCI कडून मिळणार दरमाह एवढी रक्कम)
संसर्ग रोखण्यासाठी 'ही' काळजी घ्या
आय फ्लू हा अत्यंत संसर्गजन्य आजार असल्याने तो रोखण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे.
- वारंवार साबण आणि स्वच्छ पाण्याने हात धुण्याची सवय ठेवा.
- अस्वच्छ किंवा न धुतलेल्या हातांनी डोळ्यांना अजिबात स्पर्श करू नका.
- स्वतःचा रुमाल, टॉवेल, उशीचे कव्हर किंवा आय ग्लासेस इतरांना वापरण्यासाठी देऊ नका.
- संसर्ग झाला असल्यास इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून काळा चष्मा वापरा.
परस्पर स्टेरॉइड ड्रॉप्स वापरणे ठरेल धोकादायक!
अनेक नागरिक डोळे लाल झाल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला न घेता थेट मेडिकल स्टोअरमधून आय ड्रॉप्स आणून वापरतात. यावर तज्ज्ञांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा मेडिकलमधून परस्पर आणलेले स्टेरॉइडयुक्त आय ड्रॉप्स वापरणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. यामुळे डोळ्यांच्या बाहुलीला हानी पोहोचू शकते किंवा दृष्टीवर कायमचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्रास सुरू होताच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world