जाहिरात

Chhatrapati Sambhajinagar: "दोन दिवसांत बघतो...", दारुड्याची भररस्त्यात पोलिसांना मारहाण, पाहा VIDEO

Chhatrapati Sambhajinagar Crime News: छत्रपती संभाजीनगरच्या हायकोर्ट सिग्नलवर एका दारुड्याने आणि त्याच्या पत्नीने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण केली.

Chhatrapati Sambhajinagar: "दोन दिवसांत बघतो...", दारुड्याची भररस्त्यात पोलिसांना मारहाण, पाहा VIDEO

छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला एका मद्यधुंद व्यक्तीने आणि त्याच्या पत्नीने मिळून मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. हायकोर्ट सिग्नलवर हा सर्व राडा झाला असून, पोलिसांनी या दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे. सोमनाथ मुरलीधर गिरी असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

नेमकं प्रकरण काय?

वाहतूक पोलीस कर्मचारी संतोष खरात हे हायकोर्ट सिग्नलवर आपली ड्युटी करत होते. त्याच वेळी सोमनाथ गिरी हा दुचाकीवरून डिव्हायडरच्या जवळून धोकादायक पद्धतीने गाडी चालवत होता. खरात यांनी त्याला थांबवले असता, तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

(नक्की वाचा-  Bhandara News: घरात आईचे पार्थिव, डोळ्यांत अश्रू... पण मुलाने स्वत:ला सावरत दिला बोर्डाचा पेपर)

भररस्त्यात पती-पत्नीचा धिंगाणा

पोलीस कर्मचाऱ्याने चौकशी सुरू करताच सोमनाथने हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्याने केवळ शिवीगाळच केली नाही, तर "तुम्हाला दोन दिवसात बघून घेतो," अशी धमकीही दिली. वाद वाढत गेल्यानंतर त्याने आपल्या पत्नीला तिथे बोलावून घेतले. पत्नी घटनास्थळी आल्यानंतर दोघांनी मिळून पोलिसांशी वाद घातला. बाचाबाची दरम्यान त्यांनी पोलीस कर्मचारी खरात यांना चापट मारली आणि धक्काबुक्की केली. सोमनाथ गिरी एवढ्यावरच थांबला नाही, तर तो चक्क भररस्त्यात जाऊन झोपला, ज्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला.

(नक्की वाचा-  Curry Leaves Price Hike: फोडणी झाली महाग! कोथिंबिरीसोबत फुकट मिळणारा कढीपत्त्याचा भाव वाढला)

पोलिसांची धडक कारवाई

नागरिकांनी आणि पोलिसांनी वारंवार समजावूनही हे दाम्पत्य शांत होत नव्हते. अखेर नियंत्रण कक्षाला (Control Room) माहिती देऊन पुंडलिकनगर पोलीस आणि दामिनी पथकाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या दाम्पत्याला ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणले. सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि पोलिसांना मारहाण करणे या कलमान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com