जाहिरात

Shirdi News: शिर्डी साईबाबा मंदिर परिसरातील बालकांचे आरोग्य धोक्यात, अनेकांना लागलंय 'त्या' लाल बाटलीचं वेड

कोट्यवधी साईभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीत सध्या एक धक्कादायक आणि विदारक चित्र समोर येत आहे.साई मंदिरा जवळ असलेल्या बाजारपेठ परिसरात फिरणारी आणि भीक मागणारी लहान मुले आता प्रसादाऐवजी चक्क लाल रंगाच्या ‘एनर्जी ड्रिंक’च्या आहारी गेली आहेत.

Shirdi News: शिर्डी साईबाबा मंदिर परिसरातील बालकांचे आरोग्य धोक्यात, अनेकांना लागलंय  'त्या' लाल बाटलीचं वेड
Shirdi Saibaba Temple latest News

सुनील दवंगे, प्रतिनिधी

Shirdi Latest News: कोट्यवधी साईभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीत सध्या एक धक्कादायक आणि विदारक चित्र समोर येत आहे.साई मंदिरा जवळ असलेल्या बाजारपेठ परिसरात फिरणारी आणि भीक मागणारी लहान मुले आता प्रसादाऐवजी चक्क लाल रंगाच्या ‘एनर्जी ड्रिंक'च्या आहारी गेली आहेत.‘स्टिंग' किंवा ‘कॅम्पा एनर्जी'सारख्या अत्यंत कॅफिनयुक्त पेयांमुळे या कोवळ्या बालकांच्या आरोग्याशी आणि भविष्याशी अत्यंत धोकादायक खेळ सुरू असल्याचे उघडकीस आले आहे.

श्रद्धा,दया आणि व्यसनाचा विळखा

उन्हाळ्याच्या दिवसांत दर्शनासाठी आलेले भाविक बाजारात फिरताना त्यांच्या मागे लागलेल्या मुलांना अनेकदा दयाभावनेतून हे पेय घेऊन देतात.पूर्वी पैसे,खाऊ किंवा पाणी मागणारी ही मुले आता थेट “रेड बाटली पाहिजे”अशी मागणी करत आहेत.भाविकांना वाटते की,आपण उन्हात तहान भागवण्यासाठी थंड पेय देत आहोत.मात्र,प्रत्यक्षात ते उच्च प्रमाणात कॅफिन आणि साखर असलेले उत्तेजक पेय असते.

स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार,ही मुले दिवसाला आठ ते दहा बाटल्या पितात.सुरुवातीला भाविकांकडून मिळणारे हे पेय आता मुले स्वतःच्या कमाईतूनही (भीक मागणे,फुले विकणे इ) विकत घेत आहेत.धक्कादायक बाब म्हणजे या साखळीत अत्यंत कोवळ्या मुलींचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.

‘स्टिंग'सारख्या एनर्जी ड्रिंकच्या बाटलीवर स्पष्ट शब्दांत लिहिलेले असते की,"हे पेय लहान मुलांसाठी,गरोदर महिलांसाठी आणि कॅफिन संवेदनशील व्यक्तींसाठी शिफारसीय नाही."अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI)असा इशारा देणे बंधनकारक केले आहे.तरीही शिर्डीत किराणा दुकाने,पानटपऱ्या आणि शीतपेय विक्रेते निव्वळ नफ्यासाठी कोणतीही शहानिशा न करता लहान मुलांना या पेयांची राजरोसपणे विक्री करत आहेत.

नक्की वाचा >> Ahilyanagar News : खंडाळा परिसरात नागरिकांची धडधड वाढली, 15 दिवसांपासून मानवी वस्तीत सुरु होता भयानक प्रकार

आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम

ऊर्जा देणारे पेय म्हणून विकले जाणारे हे ड्रिंक प्रत्यक्षात कॅफिन,साखर आणि विविध उत्तेजक घटकांनी भरलेले असते.वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार,लहान मुलांनी जास्त प्रमाणात कॅफिन घेतल्यास पुढील गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.हृदयाचे ठोके आणि रक्तदाब अनैसर्गिकरित्या वाढणे.चिडचिड,आक्रमकता आणि मानसिक अस्थिरता.झोप न लागणे आणि तीव्र डोकेदुखी.एकाग्रता कमी होणे आणि लहान वयातच व्यसनाधीनता जडणे.अतिरिक्त साखरेमुळे भविष्यात स्थूलता आणि मधुमेहाचा धोका.

प्रशासनाची कारवाई फक्त कागदावरच?

अहिल्यानगर जिल्ह्यात महिला व बालविकास विभाग,बालकल्याण समिती आणि पोलीस विभाग अस्तित्वात असूनही शिर्डीसारख्या आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्रात बालभिक्षेकऱ्यांची संख्या वाढतच आहे.अधिकाऱ्यांकडून होणारी कारवाई केवळ कागदोपत्री असते.काही दिवसांतच परिस्थिती ‘जैसे थे' होते आणि मंदिर लगतच्या मार्केट मध्ये पुन्हा तीच मुले दिसू लागतात.शिक्षणापासून दुरावलेली ही मुले अशा उत्तेजक पदार्थांच्या व्यसनात अडकल्याने भविष्यात गुन्हेगारी व मोठ्या व्यसनांकडे वळण्याचा धोका मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

नक्की वाचा >> Engineering साठी भारताचे टॉप-10 कॉलेज, 12 वी नंतर 'असं' मिळेल अ‍ॅडमिशन, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस एका क्लिकवर

तज्ज्ञांनी सुचवलेल्या तातडीच्या उपाययोजना 

मंदिर व बाजारपेठ परिसरात बालभिक्षेकरी मुक्त मोहीम कडकपणे राबवणे.अल्पवयीन मुलांना एनर्जी ड्रिंक विकणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करणे. व्यसनाधीन बालकांचे समुपदेशन,पुनर्वसन आणि शाळेत पुनर्प्रवेशासाठी विशेष मोहीम.भाविकांसाठी जनजागृती फलक लावणे आणि बालसुरक्षा हेल्पडेस्कची प्रभावी अंमलबजावणी करणे.

शिर्डीत येणाऱ्या भाविकांनी मुलांना पैसे किंवा एनर्जी ड्रिंक देण्याऐवजी लिंबू पाणी,ताक,दूध,फळे द्यावीत किंवा अधिकृत अन्नछत्राच्या माध्यमातून अशा मुलांना मदत करावी,असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे."सबका मालिक एक"हा संदेश देणाऱ्या साईनगरीत मुलांच्या हातातील ही ‘लाल बाटली' केवळ थंड पेयाची नसून,त्यांच्या हरवत चाललेल्या बालपणाची वेदनादायक निशाणी बनली आहे.हे संथ विष रोखण्यासाठी आता प्रशासनाने आणि समाजाने तातडीने संवेदनशील पावले उचलण्याची गरज आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com