प्रथमेश गडकरी
"माझे पसंतीचे सिडकोचे घर" या योजनेतील 26,000 घरांची लॉटरी शिवजयंतीला म्हणजेच 19 फेब्रुवारीला जाहीर झाली. अनेकांना आपल्या पसंतीचे घर मिळाले आहे. तर काहींना पसंतीचे घर न मिळता अन्य ठिकाणी घर देण्यात आले आहे. घर तर मिळाले आता पुढे काय? असा प्रश्न आता घर मिळालेल्या विजेत्यांना पडला आहे. घराचा ताबा किती दिवसांनी मिळणार? पैसे किती भरावे लागणार? पंतप्रधान आवास योजनेचा हफ्त कसा मिळणार? घर नको हवे असेल तर काय करावे लागणार? या सारखे अनेक प्रश्न लॉटरी विजेत्यांना पडले आहेत. याबाबत आत सिडकोने स्पष्टता आणली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुढची प्रक्रीया कशी?
सिडकोच्या 26,000 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली. त्यासाठी 21,399 जण लॉटरीसाठी पात्र ठरले होते. त्या पैकी जवळपास 19 हजार 518 जणांना आपल्या पसंतीचे घर मिळाले आहे. तर उर्वरीत लोकांना सिडकोच्या शिल्लक राहीलेली घरं देण्यात आली आहेत. लॉटरी लागल्यानंतर आता पुढे काय असा प्रश्न लॉटरीत विजेत्या ठरलेल्या सदनिकाधारकांना पडला आहे. आता त्यांना घराचा ताबा मिळेलपर्यंत वेगवेगळ्या प्रक्रियेतून जावे लागणार आहे. ही प्रक्रीया पुढे पंधरा दिवसात पार पडेल असं सिकडो प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
इरादा पत्र दिलं जाणार
ज्या लोकांना घर लागले आहे पण त्यांना ते नको हवे आहे. किंवा त्यांच्या पसंतीचे घर त्याना न मिळता दुसऱ्या ठिकाणी घर मिळाले आहे, अशा लॉटरी विजेत्यांना घर सरेंडर करता येणार आहेत. त्यासाठी एका आठवड्याचा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीत घर सरेंडर करावा लागेल. त्यानंतर लॉटरी विजेत्यांची अंतिम यादी तयार करण्यात येईल. त्यानुसार अंतिम यादीतील विजेत्या लॉटरीधारकांना लेटर ऑफ इंटेन्ट म्हणजेच इरादा पत्र देण्यात येईल. हे इरादापत्र ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. त्यासाठी जवळपास 15 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
ट्रेंडिंग बातमी - EVM च्या मुद्यावर ठाकरेंमध्ये मतभेद, राज ठाकरेंच्या भूमिकेला मुलगा अमितकडूनच छेद
कागदपत्रांची पडताळणी
इरादापत्र दिल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. ज्यांची कागदपत्र अपूर्ण आहेत, त्यांना ती पुर्ण करावी लागणार आहेत. अनेक जणांनी प्रतित्रापत्र मुळ अर्जाबरोबर जोडलेली नाहीत. पगाराच्या स्लिप दिलेल्या नाहीत. आदीवास दाखवा दिलेला नाही, अशा लोकांना काही विशिष्ट वेळात या कागदपत्रांची पुर्तता करावी लागणार आहे. ज्यांची कागदपत्र बरोबर आहेत. त्यांना मात्र या गोष्टी करण्याची आवश्यकता नाही. याबाबतची माहिती वेळोवेळी सिडकोच्या अधिकृत साईटवर दिली जाणार आहे.
घर फिक्स करण्यासाठी पैसे भरावे लागणार
कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर कन्फर्मेशन अमाऊंट भरावी लागणार आहे. त्यासाठी अर्ज भरताना जेवढी अनामत रक्कम भरली तेवढी रक्कम भरावी लागणार आहे. त्यानुसार EWS साठी 75 हजार रुपये भरावे लागतील. ही रक्कम भरल्यानंतर ते घर तुमच्यासाठी कन्फर्म समजले जाईल. हे पैसे भरण्यासाठी काही कालावधी दिला जाणार आहे. त्या कालावधीतच हे पैसे भरणे बंधनकारक राहील. त्यामुळे लॉटरीधारकांना या सर्व प्रक्रीयेतून जावे लागणार आहे.
अलॉटमेंट लेटर मिळणार
ही सर्व प्रक्रीया झाल्यानंतर सदनिकाधारकाला अलॉटमेंट लेटर दिले जाईल. हे लेटर ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. हे लेटर मिळाल्यानंतर सदनिकाधारक लॉनसाठी अर्ज करू शकतात. लॉन मिळाल्यानंतर सिडकोने ठरवून दिलेल्या प्रमाणे हफ्ते भरावे लागणार आहेत. याच अलॉटमेंट लेटरवर घराचा ताबा कधी दिली जाणार आहे याची तारीख दिली जाणार आहे. शिवाय शेवटचा हफ्ता हा पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थिंना मिळणार आहे. अशा पद्धतीने सिडकोची पुर्ण प्रक्रीया लॉटरीधारकांना पार पडावी लागेल.