
Amit Thackeray vs Raj Thackeray : विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही जागा मिळाली नाही. प्रतिष्ठेच्या माहिम, शिवडीसह सर्वच मतदारसंघात राज ठाकरेंच्या उमेदवारांचा पराभव झाला. माहिम मतदारसंघातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पराभूत झाले. पक्षाच्या या खराब कामगिरीनंतर मनसे अध्यक्षांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनवर (EVM) शंका उपस्थित केली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज ठाकरे यांचं वक्तव्य हा मनसेमध्ये अंतिम शब्द असतो. पण, त्यांच्या या वक्तव्याला त्यांचा मुलगा अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनीच छेद दिला आहे. निवडणुकीच्या पराभवाला EVM ला दोष देणे हे पक्षाचे धोरण आहे. पण, पराभवाला आपणच जबाबदार आहोत, असं माझं स्पष्ट मत आहे, असं वक्तव्य अमित यांनी पक्षाच्या बैठकीत केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी झाली. त्या बैठकीत अमित यांनी पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाच्या पराभवाला ईव्हीएम जबाबदार आहे, असं पदाधिकाऱ्यांचं मत असेल तर ते सिद्ध करुन दाखवा असं आवाहनही त्यांनी या बैठकीत केली असल्याची माहिती आहे.
( नक्की वाचा : 'राज-उद्धव होते जोडीला'...उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात वाजला राज ठाकरेंचा पोवाडा, नेमकं काय घडलं? Video )
विधानसभा निवडणुकीत मला अतिआत्मविश्वास नडला. प्रचाराच्या कालावधीत घरोघरी पोहचू शकलो नाही, अशी कबुलीही अमित यांनी यावेळी दिली. विधानसभा निवडणुकीतील अपयशाचे खापर एकमेकांवर फोडणाऱ्या विभाग अध्यक्षांचीही त्यांनी कानउघडणी केली. पदाची जबाबदारी पेलवत नसेल तर राजीनामा द्या. ज्यांना काम करायचं असेल त्यांना संधी द्या, असंही अमित यांनी या बैठकीत सुनावलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काय म्हणाले होते राज?
राज ठाकरे यांनी यापूर्वी मनसेच्या मेळाव्यात निवडणूक निकालावर शंका उपस्थित करत EVM वर आक्षेप नोंदवले होते. 'मतदानावर जाऊ नका, लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे, ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये. लोकांनी आपल्याला केलेलं मतदान कुठेतरी गायब झालंय. अशा प्रकारे निवडणुका लढवायच्या असतील तर त्या न लढवलेल्याच बऱ्या,' असं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं होतं.
( नक्की वाचा : पहिली मशाल घेऊन मातोश्रीवर आलेल्या कार्यकर्त्याचा ठाकरेंना जय महाराष्ट्र! वाचा खळबळजनक पत्र )
दरम्यान, आमच्या पक्षात सर्वांना बोलायचा अधिकार आहे प्रत्येक जण मत मांडू शकतो अमित ठाकरे आमचे नेते आहेत, अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केली आहे. तर निवडणुकीत EVM हा नक्की फॅक्टर आहे. EVM वर लोकांचा संशय आहे. हे हॅक होण्याचं अनेकांनी प्रेझेंटेशन दाखवलं आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी दिली आहे. जगभरातून EVM हे संशयामुळे हटवण्यात आलं आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांनीही पंतप्रधान मोदींना बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असं सांगितल्याचं राऊत यावेळी म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world