राहुल कांबळे, नवी मुंबई
सिडको कडून काढल्या जाणाऱ्या बहुप्रतीक्षित गृहनिर्माण लॉटरीला राज्य सरकारकडून घरांच्या किमतींबाबत कोणताही ठोस निर्णय न घेतल्यामुळे विलंब होत आहे. यामुळे घर घेण्याची वाट पाहणाऱ्या अनेक नागरिकांना अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे. सिडकोला म्हाडा (MHADA) नंतर आपली जम्बो लॉटरी काढायची आहे, परंतु किमतींबाबतची अनिश्चितता हे मुख्य कारण ठरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडेच झालेल्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याबाबत चर्चा केली होती. सामंत यांनी असे सांगितले होते की, घरांच्या किमती २५ ते ३० टक्क्यांनी कमी करण्याबाबत सरकार विचार करत आहे. यामुळे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध होतील अशी अपेक्षा होती. मात्र, राज्याचे नगर विकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या संदर्भात अजूनही कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. याच कारणामुळे सिडकोला लॉटरी काढण्यात अडचणी येत आहेत.
(नक्की वाचा - Javed Sheikh: काम ड्राव्हरचं, घर पत्र्याचं, तरही 500 कोटीचा मालक, कोण आहे जावेद शेख?)
विधिमंडळात प्रश्न उपस्थित
सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याच्या मुद्द्यावरून आमदार विक्रांत पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी नागरिकांच्या वतीने या मुद्द्यावर सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. सर्वसामान्यांना परवडणारी घरे मिळावीत यासाठी किमती कमी करण्याची त्यांची प्रमुख मागणी होती.
१५ ऑगस्टच्या लॉटरीची शक्यता
सिडको महामंडळ म्हाडाच्या लॉटरीनंतर आपली जम्बो लॉटरी काढण्याचा विचार करत आहे. जर राज्य सरकारने लवकरच या संदर्भात एक बैठक घेऊन घरांच्या किमतीबाबत निर्णय घेतला, तर सिडकोकडून येत्या 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी ही जम्बो लॉटरी काढण्याची तयारी केली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सिडकोच्या या जम्बो लॉटरीकडे आणि राज्य सरकारच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. परवडणाऱ्या घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल अशी आशा आहे.