"खोट्या नॅरेटिव्हद्वारे जनतेची दिशाभूल"; अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल

सरकारचं हे निरोपाचं अधिवेशन आहे, या उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, निरोपाचं अधिवेशन आहे म्हणाले, त्यासाठी अधिवेशनात यावं लागेल. फेसबुकवरुन देणार आहात का निरोप?  

जाहिरात
Read Time: 2 mins

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी तिन्ही नेत्यांनी विरोधी पक्षाने चहापानावर घातलेल्या बहिष्कारावरुन सडकून टीका केली. खोटं नॅरेटिव्ह सेट करुन विरोधक जनतेची दिशाभूल करत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, आम्हाला वाटलं चहापानाला येतील, चर्चा करतील आणि काही चांगलं जनतेसाठी होईल. एकंदरीत विरोधकांची चर्चा करायची त्यांची तयारी नाही. तुमच्यासमोर येत दिशाभूल करायची आणि स्वत:ची पाठ थोपटायची.खोटं नॅरेटिव्ह पसरवून काही प्रमाणात त्यांना क्षणिक आनंद मिळाला आहे.  मात्र इतकं करुनही काँग्रेसला 99 जागा मिळाल्या. या वेगाने 240 जागांपर्यंत पोहोचायला त्यांना 25 वर्ष लागतील. इतकं करुनही मोदी पंतप्रधान झाले, असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. 

(नक्की वाचा- आतापर्यंत एकही निवडणूक हरले नाही, कोण आहेत ओम बिर्ला ज्यांनी रचला इतिहास)

लोकांच्या दारात जात काम करणारे आमचे सरकार आहे. गेल्या दोन वर्षांच्या कामगिरीवर आमचा अर्थसंकल्प आहे. आम्ही जे बोललो ते दिलेलं आहे. उद्याचा अर्थसंकल्प देखील शेतकऱ्यांच्या हिताचा सर्वसमावेशक असेल, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. 

सरकारचं हे निरोपाचं अधिवेशन आहे, या उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, निरोपाचं अधिवेशन आहे म्हणाले, त्यासाठी अधिवेशनात यावं लागेल. फेसबुकवरुन देणार आहात का निरोप?  

Advertisement

खोटं बोला पण रेटून बोला- फडणवीस

खोटं बोल पण रेटून बोल.  मात्र आता खोटंच बोलायचं याच मानसिकतेत विरोधी पक्ष गेला आहे. राज्य सरकारने विदर्भातील 87 प्रकल्प पूर्ण करत आणले आहेत .वैनगंगा प्रकल्पाचा जीआर काढला. मध्यंतरी ही फाईल मुंगीच्या पावलाऐवढी देखील चालली नाही आणि हे आम्हाला प्रश्न विचारत आहेत, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.  

(नक्की वाचा- भारत जोडोनंतर आता आषाढी वारी, राहुल गांधी करणार ज्ञानोबा तुकोबाचा गजर)

पेपरफुटी उद्धव ठाकरे सरकार असताना देखील झाली होती. राज्यात गुंतवणूकदारांनी पाठ फिरवल्याचे सांगत आहेत. मात्र उद्योगात मागील दोन्ही वर्षी पहिल्या क्रमांकावर आपण आलो आहोत. खोटे नॅरेटिव्ह तयार करण्याची फॅक्ट्री विरोधकांनी उघडली आहे. जे प्रश्न उपस्थित केले आहेत, त्याचे उत्तरं दिली आहेत. विधानसभेत देखील उत्तरं देऊ. एक बोट आमच्याकडे उगारल्यावर चार बोटे त्यांच्याकडे निघतात, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

Advertisement