मुंबईकरांना सल्ला, कोकणात अलर्ट, राज्यभरातील पावसाबाबत मुख्यंत्र्यांकडून महत्त्वाचे अपडेट

CM Eknath Shinde on Rain : मूसळधार पावसामुळे राज्यात आणि मुंबईत निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रलायातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून आढावा घेतला. 

जाहिरात
Read Time: 2 mins
CM Eknath Shinde on Rain
मुंबई:

CM Eknath Shinde on Rain : मुंबईसह राज्यातील अनेक भागात गेल्या 24 तासांमध्ये जोरदार पाऊस झाला. मुंबईतील पावसामुळे सकाळी 4 ते 7 या कालावधीमध्ये सेंट्रल रेल्वेची ठाण्यापासूनची लोकल ठप्प होती. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. ठप्प झालेली लोकल सेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. तर, रस्त्यावरही पाणी साचल्यानं वाहनचालकांचे हाल होत आहेत.आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना याचा मोठा फटका बसला. मूसळधार पावसामुळे राज्यात आणि मुंबईत निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रलायातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून आढावा घेतला. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

गरज असेल तरच घराबाहेर पडा

मुंबईकरांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केलं. मुंबईतील रस्त्यांवर पाणी ओसरलं आहे. पावसाच्या साचलेल्या पाण्याचा निचरा होत आहे.मुंबईतील सखल भागात महापालिका आणि रेल्वेने पाणी उपसण्यासाठी पंप बसवले होते. या सर्व उपायांमुळे पाण्याचा निचरा होऊन रेल्वे सेवा सुरळीत होत आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. हार्बर आणि मध्य रेल्वेची सेवा सुरळीत झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 

( नक्की वाचा : मुसळधार पावसामुळे मदत पुनर्वसन मंत्री मदतीविना, आमदार ट्रॅकवर; विधानभवन गाठण्यासाठी पावसात पायपीट )
 

कोकणात ऑरेंज अलर्ट

कोकणातील पालघर, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. NDRF च्या प्रमुखांशी सकाळी चर्चा केली आहे. आर्मी, नेव्ही एअर फोर्स या सैन्याच्या तिन्ही दलांशी चर्चा केली असून सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याची सूचना देण्यात आली आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 

रत्नागिरी जिल्ह्यात पुढचे तीन दिवस कोकणात मुसळधार पाऊस कोसळणार असून गोवा, कर्नाटकसह कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तविली आहे. तर अरबी समुद्रात देखील कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचा इशारा हवामान खात्याना दिला आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात आँरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Advertisement

मुंबईसह राज्यात सर्व टीम अलर्ट मोडवर आहे. मुंबईत अनेक ठिकाणी अधिकारी स्पॉटवर आहेत. सगळे एकत्र काम करत आहेत. ही राजकारणाची नसून सामान्य जनतेला मदत करण्याची वेळ आहे. सामान्य जनतेला अधिकाधिक मदत कशी मिळेल हे पाहिलं जात आहे, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलंय