Nashik News : ...तर नाशिकमध्ये 26 एप्रिलपासून CNG विक्री बंद करणार, पेट्रोल पंप चालकांचा इशारा

Nashik CNG News : रोज निदान 10 तास सुरळीत CNG पुरवठा न झाल्यास 26 एप्रिलपासून नाशिक जिल्ह्यात पंप चालक CNG ची विक्री बंद करणार असल्याचा इशारा नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर असोसिएशनने दिला आहे. 

जाहिरात
Read Time: 3 mins

प्रांजल कुलकर्णी, नाशिक

Nashik CNG News : नाशिकमध्ये CNG ची विक्री बंद होण्याची शक्यता आहे. CNG चा पुरवठा सुरळीत होत नसल्याने  ग्राहकांपाठोपाठ पेट्रोल पंप चालकही वैतागले आहेत.  MNGL कडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने पंप चालकांनी बंदचा इशारा दिला आहे. रोज निदान 10 तास सुरळीत CNG पुरवठा न झाल्यास 26 एप्रिलपासून नाशिक जिल्ह्यात पंप चालक CNG ची विक्री बंद करणार असल्याचा इशारा नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर असोसिएशनने दिला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिडेटेडला लिहिलेल्या पत्रात नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर असोशिएशनने म्हटलं की, "सर्वप्रथम नाशिक जिल्ह्यातील ग्राहकांना CNG सारखे एक पर्यायी इंधन उपलब्ध करून दिल्याब‌द्दल MNGLचे मनःपूर्वक आभार. नाशिक जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालक व ग्राहक आपले शहरात व जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर आनंदित झाले होते. काही पंपांवर सीएनजी चालू झाल्यानंतर लवकरच बऱ्याच ठिकाणी सीएनजी पुरवठा चालू होईल व ग्राहकांची सोय होईल असे चित्र उभे राहिले. बऱ्याचशा पंपांनी ग्राहक सेवेसाठी ट्रांसफार्मर घेणे, लोड वाढवणे व इतर अनुषंगिक खर्च केला व गुंतवणूक केली."

Advertisement

"मात्र कितीतरी पंपांना खिशातून लाईट बिल भरत सीएनजी विक्री सुरू होण्याची वाट बघत बसावी लागली. सीएनजी विक्री चालू होण्यासाठी बरेचदा भरपूर फॉलोअप घेतल्यानंतर काही ठिकाणी सीएनजी विक्री चालू झाली. काही ठिकाणी दीड दोन वर्षापासून तयार होऊन विक्री चालू होण्याची वाट बघत आहेत. दरम्यानच्या काळात नाशिक शहरातील काही पंपांवर ऑनलाईन सुविधा देखील चालू झाली. त्यावेळी आता सर्व अलबेल झाले व ग्राहकांना 24 तास सीएनजी उपलब्ध होईल अशी आशा मनात निर्माण झाली मात्र ती देखील फोल ठरली." 

( नक्की वाचा : आपले सरकार पोर्टलवर सेवा उपलब्ध करण्यात दिरंगाई केल्यास दरदिवशी 1 हजाराचा दंड )

"आम्ही नाशिक जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप धारकांची मध्यवर्ती संघटना आहोत. आमचे जिल्ह्यामध्ये सुमारे साडेपाचशे सभासद आहेत. तसेच राज्यामध्ये आम्ही फामपेडा या संघटनेशी संलग्न आहोत पेट्रोल पंप धारक, त्यांचे कर्मचारी, ग्राहक यांना येणाऱ्या अडचणींमधून मार्ग काढणे, ऑइल कंपन्या व सरकारी कार्यालय यांच्याशी योग्य तो समन्वय साधणे. अशा स्वरूपाचे काम आमची संघटना करत असते. तसेच विविध समाज उपयोगी कार्यदेखील राबवत असते."

"नाशिकमधील एमएनजीएलच्या मालकीचे तीनही पंप अहोरात्र सुरू असतात. सीएनजीचा खरोखर तुटवडा असता तर हे हे पंप देखील अधून-मधून बंद दिसले असते. मात्र या‌द्वारे असे सरळसरळ दिसते की ग्राहकांना पेट्रोलपंपावरील सीएनजी विक्रीचा विश्वास उडाला पाहिजे आणि केवळ त्यांनी एमएनजीएलच्या पंपांवरती सीएनजी भरण्यासाठी आले पाहिजे असे नियोजन दिसते. डिझेल व पेट्रोलच्या बाबतीत आम्ही आमचे पंप ड्राय होऊ नये यासाठी आटोकाट प्रयत्न करतो. मात्र सतत सीएनजी उपलब्ध नाही असे फलक लावून आम्ही आमचे वर्षानुवर्षे जपलेलली सामाजिक व व्यावसायिक पत घालवीत आहोत. कारण ग्राहकांच्या रोषाला पेट्रोल पंप चालकालाच व कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागते. पुरवठ्याच्या वेळा ठाऊक नसल्याने कर्मचाऱ्यांनाही बोलावून बसून पगार द्यावा लागतो आहे."

( नक्की वाचा : Vishal Gawli : 'विशाल गवळीची जेल प्रशासनानं हत्या केली', आईचा आरोप, कोर्टात घेणार धाव )

"त्यामुळे मेहरबान साहेबांनी कृपया नोंद घ्यावी दिनांक 25 एप्रिल 2025 पर्यंत रोज किमान दहा तास सुरळीत सीएनजी पुरवठा सर्व पंपांना झाला नाही तर दिनांक 26 एप्रिल 2025 पासून हे सर्व पंप सीएनजीची विक्री बंद करतील. अडचण दूर न झाल्यास या आंदोलनाची व्याप्ती वाढत जाईल. सीएनजी विकणाऱ्या पेट्रोल पंप चालकांनी आजवर अतिशय संयमाची व MNGLला पाठिंब्याचीच भूमिका घेतली आहे. मात्र MNGL कुठल्याही बाबीकडे सकारात्मकपणे बघत नसल्याने आम्हाला नाईलाजाने हे पाऊल उचलावे लागत आहे."

Topics mentioned in this article