
शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका हॉटेलमध्ये सहकुटुंब जेवायला गेलेल्या महिलेला दिलेल्या सूपमध्ये झुरळ आढळल्याची तक्रार समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अहवालानंतर महात्मा गांधी रोडवरील हॉटेल भिवंडी दरबार या हॉटेलचे मालक आणि व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
( नक्की वाचा: PMPML ने बंद केले तोट्यातील मार्ग बंद, 64 नव्या मार्गांवर सेवा सुरु! )
दापोडी येथील रहिवासी अश्विनी रवी शिरसाट (वय 31) यांनी याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी हॉटेल भिवंडी दरबारचे व्यवस्थापक अमन हुसेन शेख (वय 24, रा. आझादनगर, वानवडी) आणि हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. ही घटना 16 जून रोजी रात्री सव्वा नऊ वाजता महात्मा गांधी रोडवरील हॉटेल भिवंडी दरबार येथे घडली.
या सूपची तपासणी केल्यावर ते आरोग्यासाठी अपायकारक असल्याचा अहवाल अन्न व औषध प्रशासनाने दिला, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यामुळे हॉटेलमधील स्वच्छतेचा आणि अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
बन मस्कामध्ये काचेचे तुकडे
गुडलक कॅफे (Cafe Goodluck Pune) हे पुण्यातील खाद्यप्रेमींच्या अत्यंत आवडीचे ठिकाण. इथला बनमस्का हा जगात फेमस आहे असा अभिमान पुणेकरांना आहे. तो खाण्यासाठी अनेकजण लांबून इथे येत असतात. या गुडलक कॅफेमधल्या फेमस असलेल्या बन मस्कामध्ये काचेचे तुकडे आढळून आले आहेत.
( नक्की वाचा: गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांवर खटले दाखल होणार नाहीत, पुणे पोलिसांची ग्वाही )
आकाश जलगी हे सपत्नीक गुडलक कॅफेमध्ये खाण्यासाठी आले होते. त्यांनी बन मस्का मागवला होता. पावाचा तुकडा तोडत असताना दाताखाली खडा आल्यासारखं त्यांना वाटलं. सुरूवातीला बर्फाचा खडा असावा असं त्यांना वाटलं होतं, मात्र नीट बघितलं असता तो काचेचा तुकडा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबद्दल त्यांनी कॅफेच्या मालकाकडे तक्रार केली होती. मालकाने माफी मागितली आणि त्यांच्याकडून पैसे घेतले नाहीत. हा प्रकार लहान मुलाच्या बाबतीत घडला आणि काचेचा तुकडा त्याच्या पोटात गेला तर अनर्थ होऊ शकतो असे वाटल्याने जलगी यांनी अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवली आहे. कॅफेच्या मालकांनी या घटनेबद्दल स्पष्टीकरण देताना म्हटले की ते बन बाहेरून विकत घेत असतात, आणि काचेचा तुकडा बनमध्येच सापडला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world