Kalyan-Dombivli Muncipal Corporation Latest News : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात गुरुवारी महापौर दालनाबाहेर काँग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी जोरदार गोंधळ घालत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.महापौरांची भेट घेण्यासाठी तब्बल दोन तास प्रतीक्षा करूनही भेट न मिळाल्याने त्या संतप्त झाल्या.त्याचवेळी मराठी अभिनेते सिद्धार्थ जाधव हे थेट महापौर आणि आयुक्तांच्या बैठकीत दाखल झाल्याने हा वाद अधिकच चिघळला.
लोकप्रतिनिधींना भेटीसाठी तासन्तास वाट पाहावी लागते,मात्र कलाकारांना थेट प्रवेश कसा दिला जातो,असा सवाल करत कांचन कुलकर्णी यांनी महापौर आणि प्रशासनावर टीकेची झोड उठवली.लोकप्रतिनिधींना वेळ नाही आणि कलाकारांना थेट प्रवेश दिला जातो,हे योग्य नाही,असे म्हणत त्यांनी महापौर कार्यालयाबाहेर आक्रमक भूमिका घेतली.यावेळी त्यांनी अभिनेते सिद्धार्थ जाधव यांचे पालिकेसाठी नेमके योगदान काय आहे,असा प्रश्न उपस्थित करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही नाराजी व्यक्त केली.
नक्की वाचा >> Solapur News: सोलापूरच्या घोंगडे वस्ती मंदिरात अचानक भाविकांची मोठी गर्दी जमली, प्रवेशद्वाराजवळ काय घडलं?
परिसरात काही काळ तणावाचे वातावरण
महापौर आणि आयुक्त लोकप्रतिनिधींना जुमानत नसल्याचा आरोप करत त्यांनी दालनाबाहेरच आंदोलनात्मक पवित्रा घेतल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.जवळपास वीस मिनिटे महापौर कार्यालयाबाहेर हा गोंधळ सुरू होता. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच महापौर स्वतः दालनाबाहेर आले आणि कांचन कुलकर्णी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
नक्की वाचा >> Beed News: पतीला चिकन राईस आणायला पाठवलं, पत्नीचा इन्स्टाग्रामवर सुरु झाला भयानक खेळ, प्रियकराने संधी साधली
सिद्धार्थ जाधव यांनी दिलं स्पष्टीकरण
त्यानंतर चर्चेसाठी त्यांना महापौर दालनात बोलावण्यात आले.यानंतर हा वाद निवळला.दरम्यान,या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अभिनेते सिद्धार्थ जाधव यांनी,मी एका नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने महापौर आणि आयुक्तांची भेट घेण्यासाठी आलो होतो. यामागे कोणताही अन्य हेतू नव्हता.प्रयोगासाठी सर्वांना आमंत्रित करण्यासाठीच ही भेट होती,असे सांगत अधिक भाष्य करण्याचे टाळले.या घटनेमुळे केडीएमसी मुख्यालयातील प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून राजकीय वर्तुळात या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world