संजय तिवारी, नागपूर
राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद न मिळाल्याने नाराज विजय वडेट्टीवार महायुतीत जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. विधानपरिषदेच्या उमेदवारीसह कॅबिनेट मंत्रिपदाची अट विजय वडेट्टीवार यांनी घातली आहे. 11 ते 15 मार्च दरम्यान विजय वडेट्टीवार मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विजय वडेट्टीवार अजित पवारांच्या पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं आहे. त्यानंतर आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावर देखील टांगती तलवार आहे. अशावेळी दोन पैकी एक मंत्रिपदाची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे .
(नक्की वाचा- राजीनामा देण्यास नकार, मुख्यमंत्र्यांची ताकीद; पडद्यामागे घडल्या नाट्यमय घडामोडी)
राष्ट्रवादीत जाण्याची इच्छा नसलेल्या विजय वडेट्टीवारांचे कार्यकर्ते भाजपमध्ये गेले आहेत. विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना विजय वडेट्टीवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत 11 ते 15 मार्च या दरम्यान घडामोडी घडणार असल्याची दाट शक्यता आहे. ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात गेली 50 वर्षे काँग्रेससोबत असलेल्या खंद्या कार्यकर्त्यांनी मुंबई येथे प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.
या कार्यकर्त्यांसमोर विजय वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, असे आता सूत्रांकडून समोर आले आहे. विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे विधानपरिषदेची उमेदवारी आणि मंत्रिपद मागितले असल्याची माहिती मिळत आहे.
(नक्की वाचा- संतोष देशमुखांच्या हत्येचे अंगावर काटा आणणारे फोटो आले समोर, मन होईल सून्न)
विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तर त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. पुन्हा ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून निवडून यावे लागेल. त्याऐवजी त्यांनी विधानपरिषदेच्या वाटेने विधिमंडळात जाण्याचे ठरवले असल्याचं कळतंय. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी याच महिन्यात पोटनिवडणूक होत आहे. तेव्हा विधानपरिषद व मंत्रिपद द्या, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केल्याचे समोर येत आहे.
मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची मुळीच इच्छा नसलेल्या ब्रह्मपुरी विधानसभेतील गौरव अशोक भैय्याजी, नगरपरिषद माजी गटनेते विलास विखार, माजी नगर परिषद उपाध्यक्ष डॉ. सतीश कावळे, पंचायत समितीचे माजी सभापती नामदेव लांजेवार, सुरेश दर्वे यांसह अनेकांनी मंगळवारी मुंबईत भाजपात प्रवेश केला आणि या पक्ष प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात खिंडार पडले.