अमजद खान
कोरोनामुळे कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत एकाचा मृत्यू झाला आहे. तर तीन कोरोना रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबतची माहिती आरोग्य खात्याचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी दिली आहे. शिवाय नागरीकांनी आरोग्य विषयी काळजी बाळगावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसापासून मुंबई आणि परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही पण काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचे चार रुग्ण आढळून आले होते.त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. कल्याण डोंबिवली कोरोनाचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. या पूर्वी मार्च 2020 मध्ये आलेल्या कोरोना साथीमुळे कल्याण डोंबिवली ही दोन्ही शहरं कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली होती. मात्र त्यानंतर ही कल्याण डोंबिवलीकर सावरले होते. कोरोना गेला होता. पण आता पुन्हा कोरोनाने त्याच कल्याण डोंबिवलीत शिरकाव केला आहे.
त्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे. मात्र नागरीकांनी घाबरुन न जाता आरोग्य विषय काळजी घ्यावी असे आवाहन महापालिकेने केले आहे. कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाल्याने महापालिकेने कल्याणच्या रुक्मीणीबाई आणि डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात आयसोलेशन वार्ड सुरु केले आहे. तसेच उद्यापासून कोरोनाची टेस्टही करता येणा आहे अशी माहिती उपायुक्त बोरकर यांनी दिली आहे.
उपायुक्त बोरकर यांनी आवाहन केले आहे की, श्वास घेण्यास त्रास झाल्यास, सर्दी, खोकला, अंगदुखी, घसा धरणे आदी लक्षणे जाणवल्यास तातडीने संबंधित रुग्णाने नजीकच्या आरोग्य केंद्रात जावे. लक्षणे सौम्य स्वरुपात असली तरी कोरोना टेस्ट करुन घ्यावी. त्याचबरोबर नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे, टाळावे, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्स पाळावे, शिंकताना तोंडावर रुमाल धरावा. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे. वेळीच उपचार घेतला तर रुग्ण कोरोनामुक्त होऊ शकतो.