मुंबई-पु्ण्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत असल्याचं दिसत आहे. ठाणे शहरात शुक्रवारपर्यंत नवे १० कोरोना रुग्ण आढळले आहेत. दरम्यान शनिवारी सकाळी एका 21 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोरोनामुळे 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या तरुणाला मधुमेहाचा त्रास असल्याचं समजते. यासाठी त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्याला वयाच्या सातव्या वर्षापासून मधुमेहाचा आजार होता. मधुमेह आणि अॅसिडोसिसवरील उपचारासाठी तो कळवा रुग्णालयात दाखल झाला होता. त्याच्या फुप्फुसामध्ये संसर्ग झाला होता. रुग्णालयात दाखल झाल्यावर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती रुग्णालयाकडून सांगितली जात आहे.
नक्की वाचा - आपत्ती काळात अडचणीत सापडलात? काळजी करू नका! 'या' क्रमांकावर संपर्क करा
त्याची प्रकृती जास्त बिघडल्यामुळे त्याला आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. यानंतर तो व्हेंटिलेटरवर होता. मात्र त्याला वाचविण्यात डॉक्टरांना यश आलं नाही. आधीच इतर गुंतागुंतीचे आजार आणि त्यात कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.
हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये नव्या कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. नव्या कोरोना व्हेरिएंटच्या लक्षणांमध्ये ताप, खोकला ही लक्षणे दिसून येतात. शिवाय घसा खवखवणे, दुखणे याचा ही त्रास होतो. थकवा जाणवणे, अंगदुखी आणि डोकेदुखीचा ही त्रास यात होताना दिसून आला आहे. सर्दी, नाक वाहणे, चव, वास घेण्याची क्षमता कमी होणे ही पूर्वीची लक्षणेही दिसून येत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे गरजेचे आहे.