सुरज कसबे, पिंपरी चिंचवड
चिंचवडमधील एका चित्रपटगृहात सिनेमा पाहताना ‘स्टोरी आधी सांगू नका' असे सांगितल्यामुळे एका 29 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्या तक्रारीवरून चिंचवड पोलीस ठाण्यात एका दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुण आपल्या पत्नी आणि बहिणीसोबत सिनेमा पाहत होता. त्याचवेळी त्याच्या मागील सीटवर बसलेले एक दाम्पत्य सिनेमाची स्टोरी सांगत होते आणि गोंधळ घालत होते. त्यामुळे तरुणाने त्यांना शांत बसण्याची आणि सिनेमाची कथा आधी सांगू नये अशी विनंती केली.
(नक्की वाचा- Pune Water Crisis: धरणे फुल, तरीही पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट? काय आहे कारण?)
आरोपींनी पती-पत्नीला केली मारहाण
तरुणाच्या या विनंतीमुळे संतापलेल्या आरोपीने लगेचच त्याची कॉलर पकडून त्याला मारहाण करायला सुरुवात केली. आरोपीने त्याला लाथा-बुक्क्यांनी मारून जमिनीवर पाडले. यात तरुणाच्या डाव्या हाताला, चेहऱ्याला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली. भांडण सोडवण्यासाठी त्याची पत्नी पुढे आल्यावर आरोपी आणि त्याच्या पत्नीने तिलाही मारहाण केली आणि दोघांना शिवीगाळ केली.
(नक्की वाचा- Heart Attack नंतर तडफडणाऱ्या व्यक्तीच्या मदतीला धावले डॉक्टर, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO)
या घटनेनंतर पीडित तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अकिब जावेद निसार पटेल आणि एका महिला आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता 117, 115, आणि 352 नुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.