ऋतिक गणकवार, प्रतिनिधी
Loco Pilot VRS: मुंबईतील रेल्वे प्रशासनात सध्या खळबळ माजली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील तब्बल 72 लोको पायलट (मेल) यांनी प्रशासकीय छळ आणि मानसिक त्रासाला कंटाळून सामूहिकरीत्या स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना पत्र लिहून आपली मागणी मांडली आहे. प्रशासकीय दबाव आणि कामाच्या ठिकाणच्या असुविधांमुळे निर्माण झालेला तणाव आता टोकाला गेल्याचे या पत्रातून स्पष्ट झालंय.
प्रशासकीय दबावामुळे लोको पायलट्स तणावात
गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे सेवेत प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या या लोको पायलट्सनी पत्रात आपल्या व्यथा मांडल्या आहेत. सातत्याने वाढणारा प्रशासकीय दबाव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणारा छळ यामुळे सर्व कर्मचारी मानसिक तणावाखाली वावरत आहेत.
कामाच्या वेळांमधील अनियमितता आणि प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. हा शारीरिक आणि मानसिक त्रास आता सहनशक्तीच्या पलीकडे गेल्याने त्यांनी हे पत्र देऊन स्वेच्छानिवृत्तीची मागणी केली आहे.
( नक्की वाचा : Pune News : पुणेकरांनो सुटका झाली, हिंजवडी मेट्रो धावली! 23 किलोमीटर प्रवासातील सर्व स्टेशन्स कोणती? पहा VIDEO )
जेवण आणि विश्रांतीगृहातील दयनीय अवस्था
लोको पायलट्सनी उपस्थित केलेल्या तक्रारींमध्ये धावत्या गाडीतील आणि विश्रांतीगृहातील (रनिंग रूम) सोयीसुविधांचा अभाव हा मुख्य मुद्दा आहे. ड्युटीवर असताना पुरवले जाणारे जेवण अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि अस्वच्छ असते, जे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. तसेच रनिंग रूममध्ये किमान स्वच्छता आणि देखभालीचा अभाव असल्याने, प्रदीर्घ काळ ड्युटी केल्यानंतर लोको पायलट्सना आवश्यक असलेली विश्रांती मिळणे कठीण झाले आहे.
या पायाभूत सुविधांच्या अभावामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर आणि सुरक्षिततेवर परिणाम होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सुरक्षिततेचा प्रश्न आणि अपुऱ्या पायाभूत सुविधा
केवळ जेवणच नाही, तर कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी असलेल्या मार्गांची अवस्थाही बिकट असल्याचे समोर आले आहे. लॉबी, ट्रिप शेड आणि रनिंग रूमकडे जाण्यासाठी सुरक्षित रस्ते, पुरेसा प्रकाश आणि पाथवे नसल्यामुळे रात्रीच्या वेळी किंवा खराब हवामानात अपघात होण्याची भीती असते.
वारंवार तक्रारी करूनही रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी असून, स्वत:च्या सुरक्षिततेसाठी त्यांनी आता थेट नोकरी सोडण्याचा पवित्रा घेतला आहे.
( नक्की वाचा : राज्याला मिळाले 11 अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि 69 तहसीलदार; तुमच्या तालुक्याचे नाव आहे का? एकदा वाचाच! )
कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्यावर गंभीर परिणाम
अनियमित ड्युटी आणि सततच्या तणावामुळे या लोको पायलट्सच्या कौटुंबिक आयुष्यावरही गदा आली आहे. प्रदीर्घ काळ चालणाऱ्या मानसिक ओढाताणीमुळे त्यांचे शारीरिक आरोग्य ढासळले असून वैयक्तिक सन्मान राखणे कठीण झाले आहे. रेल्वे सुरक्षा श्रेणीतील महत्त्वाचे काम करताना लागणारी मानसिक शांतता आता उरलेली नाही, असे या 72 कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. या सर्व कारणांमुळे त्यांनी सामूहिकरीत्या व्हॉलंटरी रिटायरमेंट स्कीम (VRS) अंतर्गत निवृत्ती देण्याची मागणी रेल्वे व्यवस्थापकांकडे केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world