जाहिरात

मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026'चे उद्घाटन

Mumbai News: दक्षिण मुंबईतील नरिमन पॉईंट येथील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये 'वनरंग 2026' या तीन दिवसीय राज्यस्तरीय सांस्कृतिक आणि पारंपरिक उत्सवाचा भव्य शुभारंभ झाला.

मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026'चे उद्घाटन

महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानीतील सर्वात प्रतिष्ठित आणि मोक्याच्या ठिकाणी मानल्या जाणाऱ्या नरिमन पॉईंट येथील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये शुक्रवारी तीन दिवसीय राज्यस्तरीय सांस्कृतिक व पारंपरिक उत्सव 'वनरंग 2026'चा अत्यंत भव्य आणि उत्साही वातावरणात शुभारंभ झाला.

या भव्य उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या सोहळ्यास राज्याचे अन्न व औषध प्रशासन (FDA) व विशेष साहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांची विशेष उपस्थिती होती. दुर्गम जंगले, डोंगर-दऱ्यांमध्ये जपलेली समृद्ध आदिवासी संस्कृती थेट मुंबईकरांच्या वेशीवर पोहोचवणारा हा उत्सव ठरत आहे.

मध्यस्थांपासून मुक्ती; थेट आर्थिक लाभावर भर

'वनरंग' या महोत्सवाच्या केंद्रस्थानी भिल्ल, कोकणा, ठाकर आणि गोंड या चार प्रमुख जमातींची जीवनशैली आणि वारसा मांडण्यात आला आहे.  आदिवासी कारागीर, पारंपरिक वैद्य, महिला बचत गट आणि शेतकऱ्यांना मध्यस्थांशिवाय थेट ग्राहकांशी जोडण्यात आले आहे. वारली व गोंड चित्रकारी, सेंद्रिय शेती उत्पादने आणि नैसर्गिक औषधी वनस्पतींच्या विक्रीचा संपूर्ण प्रत्यक्ष आर्थिक लाभ थेट कारागिरांच्या खात्यात पोहोचण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आदिवासी कला, हस्तकला आणि नैसर्गिक उत्पादनांना राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देण्यासाठी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या प्रयत्नांचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले. त्यांच्या पुढाकारामुळेच महाराष्ट्रातील दुर्गम भागात देशातील पहिले 'ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर' आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) साकार होऊ शकली आहे. क्रीडा क्षेत्र, उच्च शिक्षण आणि कलेच्या संवर्धनासाठी त्यांनी पारदर्शक साहाय्य यंत्रणा उभारली आहे.

7 ते 9 ऑगस्ट दरम्यान रंगणार विविध कार्यक्रम

7 ते 9 ऑगस्ट दरम्यान रंगणाऱ्या या महोत्सवात महाराष्ट्रातील 4 जमातींच्या जीवनशैलीचे प्रदर्शन आणि देशातील 12 इतर राज्यांतून आलेल्या हस्तकलेचे प्रीमियम स्टॉल्स असतील. एनसीपीए समोरील मरीन ड्राईव्हवर प्रसिद्ध कलाकार चेतन राऊत यांच्या हस्ते 'जनजातीय मोझॅक आर्ट इन्स्टॉलेशन' साकारण्यात आले आहे. प्रख्यात छायाचित्रकार कोलस्टन ज्युलियन यांनी टिपलेल्या छायाचित्रांवर आधारित 'वनरंग फोटो बुक'चे विशेष प्रकाशन या प्रसंगी करण्यात आले.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com