मुंबई उपनगरातील मुलुंड पश्चिम परिसरात शासकीय महसूल अभिलेखांमध्ये हेराफेरी करून कोट्यवधींच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे नावे लावल्याचे एक अत्यंत गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. 2013 आणि 2015 दरम्यान झालेल्या फेरफार नोंद क्रमांक 5186 आणि 5286 या नोंदींमधील कथित गैरव्यवहाराप्रकरणी अखेर 11 सप्टेंबर 2026 रोजी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणात प्रशासनाकडून मुलुंडचे मंडळ अधिकारी सागर भीमराव भालेकर यांनी तक्रारदार (सुमोटो) म्हणून तक्रार दाखल केली असून, पोलीस निरीक्षक मायादेवी सुकुमार कळगावे यांच्याकडे या हाय-प्रोफाइल प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी अन् तपासातील मुख्य मुद्दे
या फेरफार नोंदीबाबत आशिक अमीरअली मर्चंट यांनी दीर्घकाळापासून महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला होता. 25 ऑगस्ट 2025 रोजी मुलुंड पोलिसांत दिलेल्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी व तहसीलदार कुर्ला (मुलुंड) यांच्या आदेशाने चौकशी सुरू झाली. सन 1991 मध्येच रद्द झालेल्या न्यायालयीन डिक्रीच्या आधारे तब्बल 23 वर्षांनंतर (2013 व 2015 मध्ये) पुन्हा बेकायदेशीरपणे फेरफार नोंदी मंजूर करून घेण्यात आल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
आरोपींकडे प्रत्यक्ष कागदपत्रांनुसार केवळ 24,356.25 चौरस मीटर क्षेत्र असताना, तत्कालीन तलाठी एन. ए. पाटेकर यांच्या संगनमताने तब्बल 1,55,072.36 चौरस मीटर क्षेत्रावर बेकायदेशीरपणे नावे नोंदवली गेली. दैनिक भास्करने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
वारस दाखले व पुरावे नष्ट करणे
वैध प्रोबेट नसताना स्वतःच्या सहीचे बनावट वारस दाखले देणे, पासपोर्टमधील आडनाव व आईच्या नावात तफावत असतानाही पडताळणी न करणे आणि 1991 ची मुख्य संचिका गहाळ करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणे, असे गंभीर आरोप तक्रारीत नमूद आहेत.
हे प्रकरण केवळ दोन व्यक्तींमधील जमिनीच्या मालकीचा वाद नसून शासकीय महसूल अभिलेखांमध्ये बनावट दस्तावेजांद्वारे करण्यात आलेली हेराफेरी आहे. त्यामुळे भारतीय दंड संहिता (IPC) 1860 च्या कलम 193, 166, 201, 204, 420, 465, 467, 468, 441, 120-ब आणि 34 अन्वये हा गुन्हा नोंदवला आहे.
तपासात मूळ फेरफार फाइल्स, अर्जांची पडताळणी, खरेदीखते आणि तत्कालीन अधिकाऱ्यांच्या सहभागाची कसून चौकशी केली जात असून, या घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी आहे हे पोलीस तपासाअंती स्पष्ट होईल.

कोणविरोधात गुन्हा दाखल?
अर्चना भल्ला, मनीष बावा, सुमित बावा, एन. ए. पाटेकर, तत्कालीन मंडळ अधिकारी (घाटकोपर)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world