- १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवणे अनिवार्य
- राज्य शासनाने वाहनधारकांसाठी एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याच्या मुदतीत ३० जून २०२६ पर्यंत वाढ केली
- १ जुलै २०२६ पासून या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंड लादला जाईल
राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी आणि वाहनांच्या ओळखीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या जुन्या वाहनांना 'उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक' (HSRP) प्लेट बसविणे अनिवार्य करण्यात आले होते. मात्र अनेकांना अजून ही HSRP नंबर प्लेट लावणे शक्य झालेले नाही. ही बाब सरकारच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे या प्रक्रियेसाठी राज्य शासनाने 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर मात्र नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यामुळे ज्यांनी अजून ही HSRP नंबर प्लेट लावली नसेल अशा वाहन चालकांनी आपल्या गाड्यांना 30 जूनच्या आत ती लावून घ्यावी असे आवाहन राज्य सरकारने केले आहे.
यापूर्वी ही मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र, प्रक्रियेचा आढावा घेता अनेक वाहनधारकांना अद्याप ही प्लेट बसवता आलेली नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही मुदत 6 महिन्यांनी वाढवून 30 जून 2026 पर्यंत केली असल्याचे स्पष्ट केले. 1 जुलै 2026 पासून ही मोहीम कडक राबवली जाईल. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही कार्यवाही केली जात आहे. ज्या वाहनमालकांनी विहित मुदतीत ही प्लेट बसवलेली नसेल, त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाईल. यामध्ये किमान एक हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
"वाहनधारकांनी एचएसआरपीसाठी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊनच आपली वेळ (Appointment) निश्चित करावी. कोणत्याही अनधिकृत एजंट किंवा मध्यस्थांच्या आमिषाला बळी पडू नका," असे आवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. राज्यातील वाहन सुरक्षा अधिक कडक करण्यासाठी 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व वाहनांना एचएसआरपी बंधनकारक आहे. ही मुदत संपत आली असतानाच कामाचा वेग आणि लोकांची गर्दी लक्षात घेऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही मुदत वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. 1 जुलै 2026 पासून मात्र या नियमाची अंमलबजावणी कठोरपणे केली जाईल.
अशी करा नोंदणी:
- परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- तुमच्या सोयीनुसार वेळ (Appoinment) बुक करा.
- वेळेवर जाऊन एचएसआरपी प्लेट बसवून घ्या.
- कोणत्याही खासगी एजंटला जास्तीचे पैसे देऊ नका.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world