Mumbai News: मुंबईतील हवेच्या प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली असून, या गंभीर परिस्थितीवर आता बॉलिवूडमधूनही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गुरुवारी, 12 मार्च रोजी मुंबईच्या अनेक भागांत धुक्याचा जाड थर पाहायला मिळाला. यावर अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने थेट सोशल मीडियावरून महानगरपालिका प्रशासनाला जाब विचारला आहे.
मुंबईत स्मॉगच्या थरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दृश्यमानता कमी झाल्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला. या भयावह परिस्थितीचा फोटो शेअर करत अभिनेत्री दीपिका पादुकोणने संताप व्यक्त केला आहे. मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 159 नोंदवला गेला असून, तो आरोग्यास घातक श्रेणीत येतो.
(नक्की वाचा- Bhandara News: लग्नाच्या घरात सनई-चौघड्यांऐवजी आक्रोश; नवरदेवाने लग्नाआधीच संपवलं आयुष्य!)
मुंबईकर गुदमरतोय!
दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर मुंबईच्या AQI मॅपचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. तिने लिहिले की, "या शहरातील नागरिक आणि इथली मुले गुदमरत आहेत. हे कसे काय चालू शकते?" यात तिने मुंबई महानगरपालिका (BMC) आणि आरोग्य विभागाला टॅग करत मदत करण्याचं आवाहन केलं आहे.
इतर सेलिब्रिटींचीही चिंता
केवळ दीपिकाच नाही, तर ऋचा चड्ढा आणि सैयामी खेर यांनीही यावर आपली मते मांडली. सैयामीने म्हटलं की, समुद्राच्या शुद्ध हवेत धावण्याची आवड असलेल्या तिला आता मास्क लावून धावावे लागत आहे. ही परिस्थिती एखाद्या महामारीसारखीच भयावह असल्याचे तिने म्हटले. तर ऋचाने या परिस्थितीला "मानवनिर्मित शोकांतिका" असे म्हटले आहे.
का बिघडतेय मुंबईची हवा?
फेब्रुवारी महिन्यापासून मुंबईतील प्रदूषणाची पातळी सातत्याने धोकादायक राहिली आहे. वाढती बांधकामे, रस्ते वाहतूक आणि हवामानातील बदल यामुळे मुंबईकरांना मोकळा श्वास घेणे कठीण झाले आहे.