दिल्लीच्या विवेक विहार इथल्या एका बेबी केअर सेंटरला शनिवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या आगीत 7 लहान बाळांचा यात होरपळून मृत्यू झाला आहे. आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला रात्री साडेबाराच्या दरम्यान मिळाली. त्यानंतर अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थाळावर गेल्या. स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाने बचाव कार्य सुरू केले. त्यात 12 लहान बाळांना बाहेर काढण्यात आले. मात्र त्यातील 7 बाळांचा मृत्यू झाला आहे. जखमी 5 बाळांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ईस्ट दिल्ली एडवांस्ड केअर हॉस्पिटल मध्ये या मुलांना दाखल करण्यात आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दरम्यान एकीकडे दिल्लीला आग लागली असताना दुसरीकडे गुजरातच्या राजकोटमधील टीआरपी गेम झोनमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा वाढत आहे. या घटनेमध्ये आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. मृतांमध्ये 12 लहान मुलांचा समावेश आहे. कित्येक जण बेपत्ता असल्याचेही म्हटले जात आहे. पण शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना घडल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. शनिवारी (25 मे 2024) संध्याकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा - आग, धूर आणि किंकाळ्या! 27 जणांचा होरपळून मृत्यू, 12 मुलांचा समावेश; PM मोदींनी व्यक्त केला शोक
दरम्यान "टीआरपी गेम झोनचे मालक आणि व्यवस्थापकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे", अशी माहिती राजकोटचे पोलीस आयुक्त राजू भार्गव यांनी दिलीय. आग लागण्यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'X' वर पोस्ट करून शोक व्यक्त केला आहे. PM मोदी म्हणाले की, 'राजकोटमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेमुळे खूप दुःख झाले आहे. ज्यांनी आपल्या जवळील लोकांना गमावले आहे, त्या सर्वांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींसाठी मी प्रार्थना करतोय. स्थानिक प्रशासन पीडितांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत".
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world