- पुणे जिल्ह्यात शिरूर-न्हावरे चौफुला रस्त्यावरील नलगे वस्तीजवळ अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला
- भीषण अपघातात कारचा चुराडा, एक जण गंभीर जखमी असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू
- अपघाताची तातडीने माहिती मिळताच स्थानिकांनी मदत केली आणि शिरूर पोलिसांनी बचावकार्य सुरू केले
- अविनाश पवार, प्रतिनिधी
Pune Accident News: पुणे जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. शिरूर-न्हावरे चौफुला रस्त्यावरील नलगे वस्तीजवळ मध्यरात्रीच्या (14 फेब्रुवारी) सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात निमोणे येथील एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून, त्या व्यक्तीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे निमोणे गावावर शोककळा पसरली आहे. भीषण अपघातामुळे परिसरात खळबळ उडालीय.
पुण्यातील नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, निमोणे येथील काळे कुटुंब आपल्या खासगी वाहनाने प्रवास करत असताना मध्यरात्रीच्या सुमारास शिरूर-न्हावरे रस्त्यावरील नलगे वस्ती परिसरात पोहोचले असता त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, वाहनाचा अक्षरशः चुराडा झालाय. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील स्थानिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. पोलिसांनाही अपघाताची तातडीने माहिती दिली. कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने ही भीषण दुर्घटना घडलीय.
तीन जणांचा जागीच मृत्यू
या दुर्घटनेत काळे कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. पवन राजहंस काळे (वय 38 वर्षे), बाळासाहेब नागवडे (वय 38 वर्षे, पवन काळे यांचे मेहुणे) आणि आराध्या पवन काळे (वय 9) अशी मृतांची नावं आहेत. अपघाताची भीषणता पाहून घटनास्थळी पोहोचलेल्या स्थानिक नागरिकांच्याही काळजाचा ठोका चुकला. घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. गंभीर जखमी असलेल्या एका व्यक्तीला स्थानिकांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
(नक्की वाचा: Pune News: लोणावळ्यात खळबळ! पत्नी-मित्रांना मेसेज अन्... लायन्स पॉईंटवर IT इंजिनिअरचं टोकाचं पाऊल)
परिसरात खळबळ आणि हळहळनिमोणे गावातील एकाच कुटुंबातील तीन जणांचा असा अचानक मृत्यू झाल्याने संपूर्ण गावासह शिरूर तालुक्यात शोककळा पसरली आहे. मध्यरात्रीच्या शांततेत घडलेल्या या घटनेने रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world