Dharavi News : धारावीकरांचे 'व्हिजन' क्लिअर, सर्वात भव्य मोफत शिबिरातून सुमारे 3 हजार स्थानिकांच्या दृष्टिदोषाचं निवारण

धारावीतील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या मोफत शिबिरात सहभागी झालेल्या स्थानिकांपैकी 83%  नागरिकांना वयपरत्वे आलेला दृष्टीदोष आणि इतर दृष्टीदोष आढळून आले.

जाहिरात
Read Time: 2 mins

धारावीत आजवर आयोजित करण्यात आलेल्या सर्वांत मोठ्या नेत्र तपासणी शिबिराला धारावीकरांचा उदंड प्रतिसाद लाभला. धारावी सोशल मिशनच्या वतीने धारावी रिसोर्स सेंटरसह विविध ठिकाणी मार्च महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या या मोफत शिबिराचा सुमारे 3000 स्थानिकांनी लाभ घेतला. इतक्या मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आलेल्या या मोफत शिबिराने धारावीत नेत्र तपासणी क्षेत्रात नवीन मापदंड स्थापित केला आहे. 

धारावीतील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या मोफत शिबिरात सहभागी झालेल्या स्थानिकांपैकी 83%  नागरिकांना वयपरत्वे आलेला दृष्टीदोष आणि इतर दृष्टीदोष आढळून आले. तपासणीनंतर यातील 1200 लाभार्थ्यांना, नेत्रतज्ञांच्या सल्ल्यानुसार विशिष्ट क्रमांकाचे चष्मे आणि 1000 लाभार्थ्यांना वाचनासाठी मोफत चष्मे वितरित करण्यात आले. एकूण लाभार्थ्यांपैकी 61% नागरिकांनी प्रथमच चष्मा वापरण्यास सुरुवात केली. यावरून धारावीत नेत्र आरोग्याविषयीची उदासीनता दिसून आली.

नक्की वाचा - Dharavi : 'पुनर्विकास हाच धारावीच्या पाणी प्रश्नावरचा एकमेव उपाय', रहिवाशांनी सांगितलं वास्तव

या उपक्रमात डोळ्यांविषयीच्या गंभीर समस्यांची देखील दखल घेण्यात आली. एकूण 190 रहिवाशांना डोळ्यांच्या पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. यातील 60% रहिवाशांना मोतीबिंदू किंवा इतर गंभीर स्वरूपाचे दृष्टीदोष असण्याची शक्यता आहे. शिबिरातील लाभार्थ्यांमध्ये सुमारे 54% महिलांचा समावेश दिसून आला. "धारावीसारख्या दाट लोकवस्तीच्या ठिकाणी विविध कारणांमुळे महिलांच्या आरोग्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. स्थानिक पातळीवर प्रभावीरीत्या करण्यात आलेली जनजागृती आणि स्वयंसेवकांच्या मदतीमुळेच मोठ्या संख्येने स्थानिकांना या मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचा लाभ घेता आला. आम्हाला धारावीत केवळ पुनर्विकास करायचा नसून धारावीकरांच्या जीवनमानाचा दर्जा देखील वाढवायचा आहे. धारावीकरांच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत" अशी प्रतिक्रिया नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या  (एनएमडीपीएल) प्रवक्त्याने दिली.

शिवणकाम करून आपला चरितार्थ चालवणारे धारावीतील 69 वर्षीय पी सेल्वे नायक यांना तपासणीनंतर नेत्र तपासणी शिबिरात मोफत चष्मा देण्यात आला. "या चष्म्यामुळे मला माझ्या टेलरिंगच्या व्यवसायात मोठी मदत झाली असून माझ्या कामाचा वेग यामुळे नक्कीच वाढेल" असा विश्वास नायक यांनी व्यक्त केला. "दृष्टीदोषामुळे मला रस्त्यावरील साइनबोर्ड्स वाचणे जिकिरीचे झाले होते. या शिबिरातून मिळालेल्या मोफत चष्म्यामुळे गाडी चालवताना माझा आत्मविश्वास वाढला असून आता मला इतरांवर अवलंबून रहावे लागत नाही" अशा शब्दांत धारावीतील 53 वर्षीय वाहनचालक कुमार थंगराज यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या मोफत नेत्र चिकित्सा शिबिरामुळे अनेक स्थानिकांना सुस्पष्ट दृष्टीसह नवा आत्मविश्वास लाभला.

नक्की वाचा - Dharavi : धारावीतील वरच्या मजल्यावरील कुटुंबाला मिळणार लाभ, शपथपत्र मागविण्याबद्दल दिलं स्पष्टीकरण

मोफत नेत्र चिकित्सा शिबिरातून समोर आलेली आकडेवारी

- एकूण 83% नागरिकांना वयपरत्वे अथवा अन्य दृष्टीदोष आढळून आले.

-1023 जणांना वाचनासाठी चष्मे आणि 1232 जणांना विशिष्ट नंबरचे मोफत चष्मे देण्यात आले. 

- 61% लाभार्थ्यांनी प्रथमच चष्मा वापरायला सुरुवात केली.

- 190 जणांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. यापैकी 60% लोकांना मोतीबिंदू अथवा गंभीर दृष्टीदोष असण्याची शक्यता आहे.
 
- एकूण 3000 लाभार्थ्यांमध्ये 54% महिलांचा सहभाग होता.

Advertisement