
Dharavi Water Problem : मुंबईतल्या कडक उन्हाळ्याचा सामना करत असताना, धारावीतील पाणीसंकट अधिक तीव्र होत जाणार आहे. या विस्तीर्ण झोपडपट्टीतील विविध भागात अनेकदा सलग तीन ते चार दिवस पाणी मिळत नाही. अनियमित पुरवठा आणि खाजगी पाण्याच्या टँकरवरील वाढते अवलंबित्व यामुळे रहिवाशांना केवळ आर्थिक त्रास होत नाही तर त्यांना गंभीर आरोग्यच्या समस्यांचा ही सामना करावा लागतो.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आमच्या घरातील जवळजवळ 70% जागा पाण्याच्या ड्रम आणि हंड्यांनी व्यापलेली आहे. आम्हाला फक्त काही तासांसाठी पाणी मिळते, जे किमान पाच कुटुंबाना एकत्र येऊन वाटून घ्यावे लागते. पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमधून गळती होत असते आणि अनेकदा त्या गटारांखालूनच आमच्या घरात येतात, असे 90 फूट रस्त्यावरील रहिवासी निजाम खान म्हणाले.
"पाण्याचा दाब अत्यंत कमी आहे त्यामुळे आम्हाला टँकरवर अवलंबून राहावे लागते आणि टँकर माफियाच्या मनमानीमुळे आम्ही त्रस्त आहोत. आम्ही गेली अनेक दशकांपासून असेच जगत आहोत. मला आशा आहे की पुनर्विकास लवकर होईल जेणेकरून आम्हाला मुंबईतील इतर वस्त्यांप्रमाणे स्वच्छ, नियमित पाणी मिळेल," असे ते पुढे म्हणाले.
( नक्की वाचा : NDTV Marathi Manch: 'धारावीचा प्रकल्प लोकांचं जिवनमान उंचावणारा' एकनाथ शिंदे स्पष्ट बोलले )
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीला भांडुप जलाशयातून दररोज पाणीपुरवठा होतो. त्याच्या सात वॉर्डांमध्ये दिवसातून एकदा, सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत कधीही पाणीपुरवठा केला जातो. पण, अलिकडच्या काळात अनधिकृत पाणी जोडण्या वाढल्या आहेत, ज्यामुळे दाब कमी झाला आहे आणि वितरणात असमानता आहे. सूत्रांनुसार, धारावीत जवळजवळ 50% जोडण्या बेकायदेशीर आहेत, जे कायदेशीर वापरकर्त्यांच्या तोंडचे पाणी पळवतात.
पाणी वाहत नाही फक्त टपकते
"धारावीतील म्हाडा, एसआरए आणि खाजगी इमारतींना बीएमसीकडून नियमित पाण्याचे बिल मिळते, तर अनौपचारिक सदनिका एकच बीएमसी मीटर शेअर करतात आणि रहिवाशांना पाणी पुरवठ्यासाठी शुल्क आकारले जाते," असे सूत्रांनी पुढे सांगितले.
वेगवेगळ्या भागातील रहिवाशांनीही अशाच चिंता व्यक्त केल्या आहेत. "पाण्याचा दाब हा एक भीषण विनोद आहे - ते वाहत नाही, फक्त टपकते," असं राजीव गांधी नगर येथील सुनीता देवी यांनी सांगितलं. "टँकर माफिया टंचाईच्या वेळी जागेवर पैसे मागतात आणि जास्त शुल्क आकारतात. त्यांच्यावर अधिकाऱ्यांनी कारवाई करावी," असेही त्या पुढे म्हणाल्या.
( नक्की वाचा : 'मिठागराच्या जमिनी विकासासाठी सुरक्षितच', धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण )
किती रक्कम पाण्यात जाते?
10,000 लिटरच्या टँकरची किंमत प्रति लिटर 800 ते 2000 रुपयांपर्यंत असते परंतु आपत्कालीन परिस्थितीत आणि उन्हाळ्यात प्रति लिटर 5,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. "पाण्यासाठी पैसे मोजायाचे की जीवनावश्यक वस्तूंसाठी पैसे खर्च करायचे हा पेच आमच्या समोर रोजच असतो," असे मुस्लिम नगरमधील एका रहिवाश्याने सांगितले.
प्रदूषण ही आणखी एक गंभीर समस्या आहे. झोपडपट्ट्यांमध्ये काम करणाऱ्या "वॉटरवाला" या सामाजिक संस्थेने गळती आणि हानिकारक बॅक्टेरियायुक्त दूषित पुरवठा ही नित्याचीच बाव असल्याचे आपल्या अहवालात नोंदवले आहे. संस्थेने त्यांच्या अहवालात नित्कृष्ठ दर्जाच्या पायाभूत सुविधांमुळे गढूळपणा, दुर्गंधी आणि ई. कोलाय सारख्या हानिकारक जीवाणूं पाण्यात सर्रास आढळणे हे मुद्दे अधोरेखित केले आहेत.
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सेसच्या तज्ज्ञांनी असे निरीक्षण नोंदवले आहे की अरुंद गल्ल्या आणि दाट घरांमुळे, पिण्याचे पाणी आणि सांडपाण्याच्या पाईप्स अनेकदा शेजारी शेजारी वाहतात आणि त्यामुळे रहिवासी जलजन्य आजारांना बळी पडतात.
धारावीत नवीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे पण हे अपुरे आहे, रहिवाशांचा असा विश्वास आहे की केवळ संपूर्ण पुनर्विकासच कायमस्वरूपी बदल घडवून आणेल. “आम्हाला स्वच्छ पिण्याचे पाणी, ताजी हवा आणि सन्माननीय जीवन हवे आहे,” असे माटुंगा लेबर कॅम्पमधील महिमा जयस्वाल म्हणाल्या. “मूलभूत गरजांना चैन म्हणून पाहिले जाऊ नये,” असेही त्या पुढे म्हणाल्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world