जाहिरात

धारावीकरांचे स्वप्न होणार पूर्ण! माटुंग्यात 10 हजार नव्या घरांच्या बांधकामाला दिमाखात सुरुवात

Dharavi Redevelopment Project: धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या अंतर्गत माटुंगा येथील रेल्वेच्या 22 एकर जागेवर पुनर्वसन इमारतींचे भूमिपूजन पार पडले आहे.

धारावीकरांचे स्वप्न होणार पूर्ण! माटुंग्यात 10 हजार नव्या घरांच्या बांधकामाला दिमाखात सुरुवात
अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेडचे (AEL) संचालक प्रणव अदाणी यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडला.
मुंबई:

Dharavi Redevelopment Project: धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या अंतर्गत माटुंगा येथील रेल्वेच्या 22 एकर जागेवर पुनर्वसन इमारतींचे भूमिपूजन पार पडले आहे. अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेडचे (AEL) संचालक प्रणव अदाणी यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडला असून, यासोबतच आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक असलेल्या धारावीतील 10 लाखांहून अधिक रहिवाशांच्या पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. या प्रकल्पांतर्गत 10 इमारतींमध्ये 10,432 घरे आणि 1,379 व्यावसायिक व औद्योगिक गाळे उभारले जाणार आहेत.

कशी आहे आधुनिक टाउनशिप?

धारावी पुनर्विकास प्रकल्पाची विशेष हेतू कंपनी (SPV) असलेली अदाणी नवभारत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (ANDPL) मूळ जागी पुनर्वसन योजनेअंतर्गत पात्र रहिवाशांना 350 चौरस फुटांची घरे उपलब्ध करून देणार आहे. या प्रकल्पातील सेक्टर 6 आणि 1 मधील पात्र रहिवाशांना माटुंगा येथील घरे प्रथम मिळतील. त्यानंतर सुमारे 4,500 सदनिका धारावीतील इतर पात्र रहिवाशांना प्राधान्यक्रमानुसार दिल्या जातील. 

प्रत्येक इमारत 37 ते 39 मजल्यांची असेल. यामध्ये किंडरगार्टन, कम्युनिटी हॉल, पोडियम उद्याने, आसनव्यवस्था, सोसायटी ऑफिसेस आणि प्रार्थनास्थळे यांसारख्या आधुनिक नागरी सुविधा पुरवल्या जाणार आहेत.

Latest and Breaking News on NDTV

कधी होणार इमारतींचे हस्तांतरण?

या 10 इमारती तीन टप्प्यांत महाराष्ट्र शासनाच्या धारावी पुनर्वसन प्रकल्प/झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे (DRP/SRA) हस्तांतरित केल्या जातील. पहिल्या 5 इमारती मार्च 2029 पर्यंत, त्यानंतरच्या 2 इमारती ऑगस्ट 2029 पर्यंत, तर उर्वरित 3 इमारती ऑगस्ट 2030 पर्यंत हस्तांतरित करण्याचे नियोजन आहे. 

इमारती हस्तांतरित झाल्यानंतर पहिली 10 वर्षे इमारती आणि सामायिक पायाभूत सुविधांची देखभाल एएनडीपीएल स्वतः करणार आहे. या भूमिपूजन सोहळ्याला महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता आणि डीआरपी/एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

जागतिक दर्जाचे डिझाइन अन् 15 मिनिटांच्या अंतरावर सर्व सुविधा

या भव्य प्रकल्पासाठी अमेरिकेतील डिझाइन कंपनी 'सासाकी', युकेची 'ब्युरो हॅपोल्ड', मुंबईतील 'स्टुडिओ पॉड', सुप्रसिद्ध वास्तुविशारद हफीझ कॉन्ट्रॅक्टर, पी अँड टी आणि आर्क स्टुडिओ यांच्यासह सिंगापूरमधील नगररचना तज्ज्ञांची मदत घेण्यात आली आहे. संपूर्ण पुनर्विकासात दुकाने, शाळा, आरोग्य सुविधा, उद्याने आणि सार्वजनिक वाहतूक असलेली संमिश्र वापराची (मिक्स्ड-युज) टाउनशिप प्रस्तावित असून सर्व अत्यावश्यक सेवा रहिवाशांना अवघ्या 15 मिनिटांच्या पायी अंतरावर मिळतील अशा पद्धतीने नियोजन केले गेले आहे.

'धारावी एक्सपिरियन्स सेंटर'चे उद्घाटन

भूमिपूजनाच्या काही दिवसांपूर्वीच 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधींच्या 157 व्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 22,500 चौरस फुटांवर उभारण्यात आलेल्या 'धारावी एक्सपिरियन्स सेंटर'चे उद्घाटन करण्यात आले. या सेंटरमध्ये प्रत्यक्ष आकाराचे सॅम्पल फ्लॅट्स, 3D वॉक थ्रू आणि संवादी प्रदर्शने उभारण्यात आली असून, त्यामुळे रहिवाशांना त्यांच्या नियोजित घरांची आणि परिसराची प्रत्यक्ष झलक पाहता येत आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com