
Dharavi News : मुंबईतील धारावी भागात घरोघरी जाऊन करण्यात आलेले सर्वेक्षण आज (मंगळवार, 12 ऑगस्ट) पूर्ण झाले आहे. जुलै महिन्यात धारावी पुनर्विकास प्रकल्प (डीआरपी) प्रशासनाने जाहीर केले होते की, घरोघरी दिलेल्या भेटींची प्रक्रिया १२ ऑगस्टपर्यंतच चालणार आहे. या संदर्भात अंतिम मुदतीची माहिती देण्यासाठी परिसरात पोस्टर्स लावण्यात आले होते. तसेच प्रसार माध्यमांतूनही घोषणांची व्यापक प्रसिद्धी करण्यात आली होती.
संधी कायम
मात्र या सर्वेक्षणाची अंतिम मुदत संपली असली तरी रहिवाशांसाठी संधी कायम आहे. इच्छुक रहिवासी डीआरपीच्या हेल्पलाइनवर संपर्क साधू शकतात किंवा धारावीतील डीआरपी /एनएमडीपीएल कार्यालयांमध्ये आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष भेट देऊन आपले नाव सर्वेक्षण यादीत नोंदवू शकतात.
सर्वेक्षण झालेल्या भागांमध्ये 12 ऑगस्टनंतर नव्याने भेटी देण्यात येणार नसल्याचे डीआरपीने स्पष्ट केले आहे. तर ज्यांनी या कालावधीत सर्वेक्षण करून घेतले नाही, त्यांनी या प्रक्रियेत स्वेच्छेने सहभाग घेतला नसल्याचे गृहीत धरण्यात येईल. तथापि, मसुदा अनुसूची - 2 जाहीर झाल्यानंतर अशा नागरिकांना अर्ज सादर करण्याची संधी मिळणार आहे.
( नक्की वाचा : Dharavi Redevelopment Plan: धारावीमध्ये अपात्र वाणिज्यिकांना मिळणार व्यवसायाची संधी )
धारावी पुनर्विकास प्रकल्प हा ‘सर्वांसाठी घर' या तत्त्वावर आधारित असून, रहिवाशांचे जीवन आणि उपजीविका सुरक्षित ठेवण्यास कटिबद्ध आहे. आजपर्यंत 87,500 हून अधिक रहिवाशांच्या घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, 1 लाखाहून अधिक घरांना क्रमांक देण्यात आले आहेत. ज्यांनी अद्याप सर्वेक्षण पूर्ण केलेले नाही, अशा सर्वांनी त्वरित पुढे येऊन आपले घर क्रमांकित करून पुनर्विकासाच्या लाभासाठी आपली पात्रता निश्चित करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world