एकाच घरात तिसऱ्यांदा चोरी, मनपा कर्मचाऱ्याची रोकड, महागड्या वस्तू आता सोनंही लंपास

मागील वर्षी दसऱ्याच्या दिवशी त्यांच्या घराबाहेर असलेली त्यांची दुचाकी चोरट्यांनी लांबवली होती. त्यानंतर दोनदा त्यांच्या घरात चोरी झाली.

जाहिरात
Read Time: 2 mins
धुळे:

नागिंद मोरे, प्रतिनिधी

धुळे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून घरफोडीचं प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. धुळे शहरातील रामदेवबाबा नगरात राहणारे मनपा कर्मचारी विजय रिसवाल यांच्या घरी चोरट्यांनी तिसऱ्यांदा घरफोडी केली. विजय रिसवाल आपल्या पुतणीला दवाखान्यात पाहण्यासाठी संपूर्ण परिवारासह भावाकडे गेले होते. चोरट्यांनी ही संधी साधत घरात प्रवेश केला व कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोकड लांबवले. 

विजय रिसवाल व त्यांच्या पत्नी रेखा रिसवाल धुळे शहरातील रामदेव बाबानगर येथे राहतात. विजय रिसवाल हे धुळे महानगरपालिकेत कर्मचारी आहेत. मागील वर्षी दसऱ्याच्या दिवशी त्यांच्या घराबाहेर असलेली त्यांची दुचाकी चोरट्यांनी लांबवली होती. या घटनेपूर्वीच काही महिन्यांपूर्वी चोरट्यांनी त्यांच्या घराला लक्ष्य करीत एकदा दीड लाख रुपये तर दुसऱ्यांदा 50 हजार रुपये चोरून नेले होते. या तीनही चोरी बाबत त्यांनी पोलिसात तक्रार दिली होती. मात्र यामध्ये फक्त पोलिसांना दुचाकी चोरी उघडकीस आणण्यात यश आले आहे. मात्र दोनदा झालेल्या घरपोडीचा खुलासा अद्याप झालेला नाही, अशी माहिती रिसवाल कुटुंबीयानी यांनी दिली आहे.

नक्की वाचा - बदलापुरातील 'ती' शाळा भाजपसंबंधित, उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

काल झालेल्या या धाडसी घरफोडीत चोरट्यांनी 2 तोळ्याचा सोने नेकलेस, 2 तोळे माळ, 2 तोळे, 4 अंगठ्या, 30 तोळे चांदी पट्टी आणि 20 हजार रूपयांची रोकड चोरून नेली. या घरफोडीत जवळपास 6 ते 7 लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आझाद नगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळावर दाखल झाले होते. दुपारी उशीरापर्यंत गुन्हा नोंद घेण्याचे कामकाज सुरू होते.

रेसवाल कुटुंबीयांच्या घरी पुन्हा झालेल्या या धाडसी चोरीमुळे धुळे शहरातील रामदेव बाबानगर परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे. त्यामुळे धुळे शहरात होत असलेल्या वारंवार धाडसी चोरीमुळे चोरट्यांनी  एक प्रकारे पोलिसांना आवाहन दिले आहे. त्यामुळे आता या चोरट्यांचा बंदोबस्त पोलीस कधी करता हे पाहणं देखील महत्त्वाचा असणार आहे.

Advertisement