जाहिरात

Elephanta :मुंबईच्या शेजारीच सापडलं 1500 वर्ष जुनं 'वॉटर मॅनेजमेंट'; एलिफंटा बेटावरील 'त्या'शोधाने जग थक्क

Elephanta Island : मुंबईच्या किनाऱ्यापासून जवळच असलेल्या जगप्रसिद्ध एलिफंटा बेटावर (घारापुरी) इतिहासाचा एक अनमोल ठेवा उघडकीस आला आहे.

Elephanta :मुंबईच्या शेजारीच सापडलं 1500 वर्ष जुनं 'वॉटर मॅनेजमेंट'; एलिफंटा बेटावरील 'त्या'शोधाने जग थक्क
Elephanta Island : या संरचनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे...
मुंबई:

Elephanta Island Water Management Discovery: मुंबईच्या किनाऱ्यापासून जवळच असलेल्या जगप्रसिद्ध एलिफंटा बेटावर (घारापुरी) इतिहासाचा एक अनमोल ठेवा उघडकीस आला आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) केलेल्या उत्खननात सुमारे 1500 वर्षांपूर्वीची दगडी बांधकामातील जलसंधारण रचना सापडली आहे. टी-आकाराचा हा पायऱ्यांचा जलसाठा (स्टेप्ड रिझर्व्हॉयर) पाहून पुरातत्व शास्त्रज्ञही थक्क झाले असून, यामुळे प्राचीन काळातील प्रगत जलव्यवस्थापन तंत्रावर नवा प्रकाश पडणार आहे.

कसा आहे हा प्राचीन जलसाठा?

ASI ने दिलेल्या माहितीनुसार, हा जलसाठा साधारण 14.7 मीटर लांब असून त्याची रुंदी 6.7 मीटर ते 10.8 मीटर दरम्यान आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या 5 मीटर खोलीपर्यंतच्या उत्खननात सुमारे 20 दगडी पायऱ्या सुस्थितीत सापडल्या आहेत. 

या संरचनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे बांधकाम करण्यासाठी वापरलेले दगड स्थानिक बेटावरचे नसून ते बाहेरून आणलेले आहेत. प्राचीन काळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर दगडांची वाहतूक करून हे बांधकाम करणे, हे त्या काळातील अभियांत्रिकी कौशल्याचे दर्शन घडवते.

( नक्की वाचा : Ashwini Bhide: मुंबई महापालिकेचा 150 वर्षांचा इतिहास बदलणाऱ्या अश्विनी भिडे कोण आहेत? 'या' मोठ्या कामामुळे ओळख )

पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी युक्ती

एलिफंटा बेटावर पावसाचे प्रमाण अधिक असले तरी येथील भूभाग खडकाळ आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत न मुरता थेट समुद्रात वाहून जाते. ही भौगोलिक अडचण लक्षात घेऊन 7 व्या शतकाच्या सुमारास येथील लोकांनी पावसाळ्यानंतर उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हा जलसाठा बांधला असावा, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. 

या संरचनेची रचना राजस्थान आणि गुजरातमध्ये आढळणाऱ्या 'बावडी' किंवा 'स्टेपवेल्स'शी मिळतीजुळती आहे. हे कोणत्याही मंदिराशी संबंधित नसल्याने याला 'कुंड' न म्हणता 'जलसाठा' म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे.

( नक्की वाचा : Maharani Tararani: महाराणी ताराराणी या मराठा नाहीत तर... जैन मुनींचं खळबळजनक वक्तव्य! वाद चिघळणार? )

प्राचीन जागतिक व्यापाराचे धागेदोरे

या उत्खननात केवळ जलसाठाच नाही, तर प्राचीन काळातील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्त्वाचे पुरावेही हाती लागले आहेत. यामध्ये रोमन संस्कृतीशी संबंधित 'इंडो-मेडिटरेनियन अम्फोरा'चे तुकडे, मेसोपोटेमियन 'टॉर्पेडो जार' आणि काचेच्या विविध वस्तू सापडल्या आहेत. 

याशिवाय 3000 हून अधिक मातीच्या भांड्यांचे तुकडे आणि कलचुरी घराण्याच्या काळातील 11 नाणीही सापडली आहेत. यावरून एलिफंटा बेट हे केवळ धार्मिक किंवा शिल्पकलेचे केंद्र नसून जागतिक सागरी व्यापाराचा एक महत्त्वाचा थांबा होता, हे आता स्पष्ट झाले आहे.

पर्यटन आणि स्थानिक लोकजीवन

ब्रिटिश काळात 'एलिफंटा' नाव पडलेल्या या बेटाचे मूळ नाव 'घारापुरी' आहे. सध्या येथे तीन गावे असून सुमारे 700 लोक वास्तव्यास आहेत. येथील स्थानिकांचे जीवन प्रामुख्याने जगप्रसिद्ध लेण्या पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांवर अवलंबून आहे. मोराजेट्टी आणि घारापुरी जेट्टीवरून होणारी वाहतूक पर्यटनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आता या नव्या शोधामुळे एलिफंटा बेटाचे महत्त्व जागतिक स्तरावर अधिक वाढणार असून, इतिहासप्रेमींसाठी हे एक नवीन आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com