आषाढी वारीसाठी (Ashadhi Wari) पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेल्या एका भाविकासोबत अनोखा प्रसंग घडला आहे. कोणाला कदाचित अतिरंजित वाटेल, परंतू भाविकाने तर यामागे पांडुरंगच उभा असल्याचं म्हटलं आहे.
कर्नाटकातील बेळगावातील एक भाविक आपल्या महाराज नावाच्या कुत्र्याला घेऊन माऊलीच्या दर्शनसाठी पंढरपुरात आले होते. कुंभार म्हणाले, महाराजला भजन ऐकायला आवडतं. एकेदिवशी तो माझ्यासोबत महाबळेश्वरजवळील ज्योतिबा मंदिराच्या पदयात्रेलाही आला होता. जूनच्या शेवटच्या आठवड्यात कमलेश कुंभार पंढरपुरला वारीसाठी गेले होते. ते निघाले तेव्हा त्यांचा कुत्रा महाराजदेखील सोबत आला. कुंभार दरवर्षी न चुकता वारीला जातात. यंदा महाराजसोबत असल्याने त्यांना आनंद वाटत होता.
नक्की वाचा - याची देही, याची डोळा! तुकोबारायांच्या अश्वाचे पहिले गोल रिंगण उत्साहात
त्यांच्या घरापासून पंढरपुरचं मंदिर 250 किलोमीटर अंतरावर आहे. कुंभार आपला मित्रपरिवार आणि महाराजला सोबत घेऊन पंढरपुरला पोहोचले. सर्वांनी विठुरायाचं दर्शन घेतलं. मात्र काही वेळानंतर त्यांना महाराज दिसेनासा झाला. महाराज गर्दीत हरवला होता. ते परिसरात महाराजला शोधत होते. मात्र तो कोणा दुसऱ्यांसोबत गेल्याचं काहीजणांनी सांगितल्यावर कुंभार निराश झाले. शेवटी 14 जुलै रोजी कुंभार घरी परतले. दुसऱ्या दिवशी जेव्हा कुंभार दार उघडून बाहेर आले तर महाराज शेपटी हलवत उभा होता. तो व्यवस्थित दिसत होता. जणू काही झालंच नसल्याचा भाव त्याच्या चेहऱ्यावरून दिसत असल्याचं कुंभार यांनी सांगितलं. तब्बल 250 किलोमीटर अंतर पार करीत महाराज सुखरूप घरी बेळगावात पोहोचला होता. या घटनेनंतर गावकऱ्यांकडूनही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पांडुरंगानेच महाराजला मदत केल्याची भावना गावकऱ्यांनी आणि कुंभार यांनी व्यक्त केली आहे.
गावकऱ्यांनी कुत्र्याला फुलांचा हार घालून त्याचं स्वागत केलं आणि गावभर मिरवणूक काढली. विशेष म्हणजे महाराज आल्याच्या आनंदात गावात जेवणाची पंगत उठली. गावकरी महाराजचं येणं म्हणजे चमत्कार असल्याचं मानत आहेत.