जाहिरात

याची देही, याची डोळा! तुकोबारायांच्या अश्वाचे पहिले गोल रिंगण उत्साहात, भाविकांच्या डोळ्यांचे फिटले पारणे

Ringan Sohla : लाखो वैष्णव देहूतून निघाल्यापासून ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतात तो क्षण म्हणजेच बेलवाडी येथील अश्वांचा गोल रिंगण सोहळा...

याची देही, याची डोळा! तुकोबारायांच्या अश्वाचे पहिले गोल रिंगण उत्साहात, भाविकांच्या डोळ्यांचे फिटले पारणे
पुणे:

देवा राखुंडे, प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील (Tukaram Palkhi Sohla 2024) बेलवाडी येथे आज संपूर्ण राज्यातील लाखो भाविकांचे लक्ष लागून असलेले जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वाचे पहिले गोल रिंगण अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले.  इंदापूर तालुक्यातील सणसर येथील मुक्काम आटोपून जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकोबारायांचा पालखी सोहळा बेलवाडी येथे दाखल झाला. लाखो वैष्णव देहूतून निघाल्यापासून ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतात तो क्षण म्हणजेच बेलवाडी येथील अश्वांचा गोल रिंगण सोहळा... हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी परिसरातील भाविकांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती. ”विठोबा-रखुमाई” व “ज्ञानोबा-तुकारामाच्या” जयघोषाने संपूर्ण आसमंत दुमदुमत होता.

टाळ-मृदुंगाचा गजर व मुखी अभंगाची वाणी घेऊन गेल्या दहा दिवसांपासून पांडुरंगाच्या भेटीसाठी पायी निघालेल्या वैष्णवांना देवाच्या अश्वांचे पहिले गोल रिंगण पाहण्याची ओढ लागली होती. सुरूवातीला बेलवाडी येथील कैलासवासी शहाजी मचाले यांच्या मेंढ्यांनी पालखीला प्रदक्षिणा घातली. तद्नंतर झेंडेकरी, हंडा तुळशी, विणेकरी, पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी, टाळकरी, पखवाजे, यांनी भक्तिमय वातावरणात प्रदक्षिणा घातल्या.

नक्की वाचा - Kokan Rain Update : रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद, अद्यापही गडावर ढगफुटीसदृश पाऊस

दरम्यान सरतेशेवटी सर्वांचे लक्ष लागून राहिलेला अश्वांचा रिंगण सोहळा सुरु झाला आणि लाखो भाविकांचे डोळे अश्वांच्या शर्यतीचा तो विलोभनीय  नयनरम्य असा क्षण टिपण्यासाठी सज्ज झाले. वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या देवाच्या अश्वाने मानाच्या घोड्याला शिवून रिंगण सोहळ्याला पूर्णविराम दिल्याने भाविकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. वारकऱ्यांनी फुगडी, लांबउड्या, दोरीवरच्या उड्या मारत कसरती करून रिंगण सोहळ्याचा आनंद लुटला.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com