- डोंबिवलीमध्ये बुक स्ट्रीट उपक्रमातून वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी हजारो पुस्तके मोफत वितरित करण्यात आली
- पै फ्रेंड्स लायब्ररी आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला
- या उपक्रमाला कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, ठाणे वाहतूक विभाग आणि महाराष्ट्र पोलीस यांचे सहकार्य लाभले
अमजद खान
सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीत आज वाचन संस्कृतीचा अनोखा उत्सव साजरा झाला. निमित्त होते 'बुक स्ट्रीट' या उपक्रमाचे. पै फ्रेंड्स लायब्ररी आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नेहरू रोड ते फडके रोड दरम्यान आयोजित या उपक्रमाला डोंबिवलीकरांनी पहाटेपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. "वाचा आणि समृद्ध व्हा" हा संदेश देत प्रत्येकाला एक पुस्तक मोफत देऊन वाचन संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रशासकीय यंत्रणांच्या सहकार्याने पार पडलेल्या या उपक्रमाने डोंबिवलीच्या सांस्कृतिक संचितात मोलाची भर घातली आहे.
डोंबिवलीच्या मुख्य रस्त्यांवर आज वाहनांऐवजी पुस्तकांचा गराडा पाहायला मिळाला. जुन्या-नवीन आणि वैविध्यपूर्ण विषयांवरील हजारो पुस्तके वाचकांसाठी मांडण्यात आली होती. विशेष म्हणजे, या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक वाचनप्रेमीला कोणतेही एक पुस्तक पूर्णपणे मोफत देण्यात आले. वाचनाची गोडी वाढावी आणि लोकांची पुस्तकांशी नाळ जोडली जावी, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. त्याला डोंबिवलीकरांनी चांगला प्रतिसाद दिला.
पहाटेच्या वेळी ही वाचनवेड्या डोंबिवलीकरांचा उत्साह कमी झाला नव्हता. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिक आपल्या आवडीचे पुस्तक शोधण्यात मग्न होते. यंदा या उपक्रमात 10,000 हून अधिक वाचक सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या भव्य आयोजनासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, ठाणे वाहतूक विभाग आणि महाराष्ट्र पोलीस यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आयोजकांना डोंबिवलीकरांनी ही चांगला प्रतिसाद दिला.
डोंबिवलीत तिसऱ्यांदा आयोजित करण्यात आलेल्या या 'बुक स्ट्रीट'मुळे शहरात सकारात्मक आणि ज्ञानमय वातावरण निर्माण झाले आहे. विनामूल्य पुस्तक वितरणाच्या या संकल्पनेचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, अशा उपक्रमांमुळे नवीन पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यास मदत होत आहे. अशा पद्धतीचा उपक्रम प्रत्येक शहरात झाला पाहीजे अशी भावना ही काहींनी व्यक्त केली. यातून शहरातील वाचन संस्कृतीला अधिक प्रगल्भ करता येईल असं ही काही जण या निमित्ताने म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world