Dombivli Elpizo Hospital News : डोंबिवलीतील सोनारपाडा परिसरातील एलपीजो रुग्णालयाने रुग्णाची आणि शासनाची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केला आहे.साप चावल्यानंतर उपचार घेतलेल्या रुग्णाच्या प्रकरणात मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि मेडिकल क्लेमचे पैसे घेण्यात आले,असा आरोप रुग्णालय प्रशासनावर करण्यात आला आहे. मनसेनं याप्रकरणी रुग्णालयावर कारवाईची मागणी केली आहे.दरम्यान,या रग्णालयाच्या प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.रुग्णालयातील तीन गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पैसे मिळत नाहीत,त्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेनं याप्रकरणाची तातडीनं दखल घेत सत्य समोर आणलं पाहिजे, अशीही मागणी केली जात आहे.
एका रुग्णासाठी दोन बिल काढले अन्..
मिळालेल्या माहितीनुसार,रवींद्र शेलार नावाचा रुग्ण काही दिवसांपूर्वी या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. त्याला सापाने दंश केला होता.उपचारा दरम्यान रूग्णालयाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाठपुरावा करण्यात आला होता. मनसे पदाधिकारी अरुण जांभळे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकाकडे तक्रार करत आरोप केला की,हॉस्पिटलने रुग्णाकडून पैसे घेतले आणि त्याचवेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिळालेल्या पैशांवरही डल्ला मारला. रुग्णाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे पैसे रुग्णालय प्रशासन कसे काय घेऊ शकतो? असा सवालही मनसेनं उपस्थित केला आहे. एका रुग्णासाठी दोन बिल काढून शासन आणि रुग्णाची फसवणूक केल्याचा आरोप करत रुग्णालयावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
नक्की वाचा >> Crime News : भाऊ बनला 'कसाई', कैचीने कापले बहिणीच्या मृतदेहाचे तुकडे, टॉयलेटमध्ये केलं भयंकर कृत्य
कल्याण डोंबिवली महापालिकेनं चौकशी करण्याची मागणी
रुग्णालय प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आलेले 70 हजार रुपये शासनाला परत करण्यात आल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.रुग्णाकडे मेडिकल क्लेम असल्याची माहितीही नंतर समोर आली.त्याआधीच मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रक्रिया सुरू केली होती,असे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.दरम्यान, रुग्णाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे आणि मेडिकल क्लेमचे पैसे हवे आहेत, त्यामुळे रुग्णालयाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप प्रशासनाने केला आहे.या वादामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून इतर तीन गरजू रुग्णांना मिळणारी मदत थांबली असून त्याचा फटका रुग्णांना बसत असल्याचे सांगण्यात येत आहे.आता या संपूर्ण प्रकरणाची कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने चौकशी करून नेमकं सत्य काय आहे, हे समोर आणावे,अशी मागणी होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world